विधानपरिषदच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर; भाजपकडून घोषणा !

0

मुंबई: विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीनंतर विधान परिषदेवर कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपाकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अंतर्गत वाद पाहायला मिळाले. पंकजा मुंडे ह्या विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही असल्याचेही बोलले जात होते. मात्र, भाजपाकडून आज प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पदासाठी भाजपाचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती. पण प्रविण दरेकर यांनी भाजपाच्या या दिग्गजांना मागे टाकत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद मिळवले आहे.

मनसेच्या तिकीटावर मागाठणे विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. 2009 ते 2014 पर्यंत ते आमदार होते. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेतून भाजपात प्रवेश केला. प्रविण दरेकर हे मुंबईच्या मागाठणे मतदारसंघातून विधानपरिषद आमदार आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यामुळे, पहिल्यांदाच विधानपरिषद आमदार बनलेल्या प्रविण दरेकर यांना भाजपाने विधानपरिषदेत मोठी जबाबदारी दिली आहे.

Copy