Private Advt

विद्यूत कॉलनीतील वयोवृध्दाला आमीष दाखवून तब्बल ६१ लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना उत्तरप्रदेशातून अटक

विद्यूत कॉलनीत राहणाऱ्या वयोवृध्द व्यक्तीला आमीष दाखवून तब्बल ६१ लाख रूपयांचा गंडा घालणार्‍या तिघांना  सायबर शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सेवानिवृत्त कृषी अधिकारी टिकाराम शंकर भोळे (वय ८८, रा. विद्युत कॉलनी) यांना २०१७ मध्ये दीपिका शर्मा नावाच्या महिलेने मोबाइलवर संपर्क साधून स्टार हेल्थ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे एलआयसी कंपनीकडे १ लाख ९५ हजार रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम परत हवी असल्यास मी सांगेन तशी प्रक्रिया पूर्ण करावी लागेलफ असे सांगून पत्नीचे आधारकार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो व २४ हजार २७० रुपयांचा धनादेश त्यांच्याकडून पोस्टाने मागवून घेतला. याचप्रमाणे रॅल हेल्थ इन्शुरन्स कंपनीत ४ लाख ७५ हजार रुपये एवढी रक्कम बाकी असल्याचे सांगून ४० हजार रुपयांची मागणी त्यांनी केली. या माध्यमातून समोरच्यांनी त्यांना तब्बल ६१ लाख ७९ हजार ५९३ रूपयांचा गंडा घातला.

या अनुषंगाने टिकाराम शंकर भोळे यांनी सायबर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. सायबरच्या पथकाने संबंधित बँक अकाउंट, पत्ते यांची तांत्रिक चौकशी केली. यावरून संबंधित भामटे दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, उपनिरीक्षक अंगद नेमाने, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, पंकज वराडे, दीपक सोनवणे, श्रीकांत चव्हाण, सचिन सोनवणे यांच्या पथकाने २९ डिसेंबर रोजी  दिल्ली येथून अमितसिंग पिता देवेंद्र प्रकाश सिंग उर्फ अमित शर्मा पिता मुलचंद शर्मा (रा. मोतीराम रोड, मानसरोवर पार्क, उत्तरप्रदेश), राजकुमार पिता कल्याणसिंग उर्फ अनुराग शर्मा (वय-३१) रा. राधा कॉलनी, गाजीयाबाद उत्तरप्रदेश आणि रविकुमार पिता यशपाल सिंग उर्फ कमलार रेड्डी (वय-३१) रा. जलालपूर, गौतमनगर उत्तर प्रदेश यांनी अटक केली. तिघांना शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.