विद्यार्थ्यांना माजी सैनिकांसोबत सेल्फी काढण्याच्या सूचना!

0
२९ सप्टेंबरला सर्जीकल स्ट्राईकचा दिवस ‘शौर्य दिन’ साजरा करण्याचे आदेश 
मुंबई –  २९ सप्टेंबरला सर्जीकल स्ट्राईक दिवस साजरा करण्यात येणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने या दिवशी शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माजी सैनिकांसोबत सेल्फी काढण्याच्या सुचना दिल्या आहेत. सर्जीकल स्ट्राईक डे साजरा करण्यावरुन विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पाऊल मागे घेतल्यानंतर राज्य शासनाने असाच एक फतवा काढला आहे. केंद्र सरकारनंतर राज्य शासनही स्वतःची जाहीरात करण्याची कुठलीच संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. सर्जीकल स्ट्राईक दिवसानिमित्त सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा, त्यांचे कुटुंबीय यांना कार्यक्रमात निमंत्रित करावे, या कार्यक्रमात सामाजिक संघटनांचा सहभाग घ्यावा, तसेच विद्यार्थ्यांना माजी सैनिकांसोबत सेल्फी काढण्याच्या सुचना दिल्या आहेत.
कार्यक्रमाचे छायाचित्र, व्हिडिओ क्लीप काढून त्याच दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत माजी सैनिक कल्याण विभागाच्या पुणे येथील कार्यालयास पाठवण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. सैनिकांप्रती असलेली आदराची भावना समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने या सूचना दिल्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. यापूर्वी युजीसीने देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयात सर्जीकल स्ट्राईक साजरा करण्याचा फतवा काढला होता. टीका झाल्यानंतर यु-टर्न घेत केंद्र सरकारने सर्जीकल स्ट्राईक डे साजरा करण्याचे सक्तीचे नसल्याचे सांगितले होते. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शौर्य दिनाच्या निमित्ताने सैनिकांप्रती आपल्याला असलेली आदराची भावना अधिक वृध्दीगंत व्हावी यासाठी सर्व जिल्हाधिकारी /जिल्हा सैनिक अधिकारी यांनी त्यांच्या जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिकांच्या विधवा/शहीद जवानांचे कुटुंबिय यांना शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास सन्मानपूर्वक निमंत्रित करुन त्यांचा यशोचित सत्कार करावा. शौर्य दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रम माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करावा. तसेच या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सदस्यापासून ते सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना आमंत्रित करावे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटनांशी समन्वय करावा. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये माजी सैनिकांसोबत शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी यांनी सेल्फी काढून फोटोज अपलोड करावे. तसेच फोटो/व्हिडिओ क्लीप्स त्याच दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक यांना पाठवावे, असे आदेशात म्हटले आहे.