विद्यार्थ्यांना दिलासा; आयटीआय प्रवेशाला मुदतवाढ

0

मुंबई: चालू शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्राचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केली. उद्या २१ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रियेची मुदत होती, त्याला आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यावर्षी कोरोनामुळे उपलब्ध जागांच्या फक्त 1.45 पट अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत इच्छा असतानाही कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

आतापर्यंत 2 लाख 55 हजार अर्ज

आयटीआय प्रवेशप्रक्रीया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात 17 हजार 984, औरंगाबाद विभागात 19 हजार 244, मुंबई विभागात 19 हजार 948, नागपूर विभागात 28 हजार 136, नाशिक विभागात 29 हजार 500, पुणे विभागात 30 हजार 820 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी 19 ऑगस्टपर्यंत 2 लाख 55 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 21 हजार 585 विद्यार्थ्यांनी शुल्क अदा कलेले असून त्यापैकी 2 लाख 07 हजार 285 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. यावरून नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 48 हजार 518 विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निर्दशनास येते. प्रवेश अर्ज मोबाईल व्दारे देखिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. दुर्गम व ग्रामिण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपव्दारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

Copy