विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा आवश्यक

0

मुक्ताईनगर : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले व .विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. येथील ई.के. टॅलेंट स्कुलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य जी.एन.व्ही. उदयश्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे विशेष म्हणजे प्ले गृप ते आठवी पर्यंतच्या जवळपास 150 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

विविध विषयांवर साकारल्या भूमिका
ऐतिहासिक पात्रांमध्ये शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सरदार वल्लभभाई पटेल, रझिया सुलतान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सांस्कृतिक पात्रांमध्ये वासुदेव, आध्यात्मिक पात्रांमध्ये संत मुक्ताबाई, श्रीकृष्ण यांच्या भूमिका साकारल्या तर एका विद्यार्थीनीने ‘नेत्रदान हे श्रेष्ठदान’ या विषयावर अंध व्यक्तिची भूमिका साकारली तर एका विद्यार्थ्याने शेतकर्‍याच्या वेशात हगणदरीमुक्त गावाची भूमिका मांडली. जागतिक तापमानवाढीचे संकट निवारण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा चा संदेश दिला. या स्पर्धेला मुक्ताईनगर व परिसरातील पालकांचीही उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी म्हणून योगेश कोलते, कोथळी माजी सरपंच नारायण चौधरी, प्रा. विजय चौधरी उपस्थित होते. सुत्रसंचालन उमेश निंबोलकर व गणेश जोगी यांनी केले. परिक्षक म्हणून प्रा. राजरत्न सोनवणे व समीर कुळकर्णी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य उदयश्री यांनी मानले. यशस्वीतेसाठी गोकुळ भोळे, मोहसिन आदी शिक्षकांनी सहकार्य केले.