विद्यार्थ्यांच्या शोभायात्रेने वेधले लक्ष

0

भुसावळातील के. नारखेडे विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने 14 व 14 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी हनुमान नगरातील तु.स.झोपे प्राथमिक विद्या मंदिरापासून विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी थोर पुरूषांची वेशभूषा साकारली तसेच लेझीम खेळत निघालेल्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, दुपार सत्रात स्मरणिका प्रकाशन, सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली.

मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन

आमदार संजय सावकारे यांचे स्वागत संस्थाध्यक्ष श्रीनिवास एन.नारखेडे यांनी तर सूत्रसंचालन तु.स.झोपे प्राथमिक विद्यामंदिराचे उपशिक्षक राहुल भारंबे तसेच प्रास्ताविक के.नाखेडे विद्यालयाचे पर्यवेक्षक वाय.एन.झोपे सर यांनी केले. उपमुख्याध्यापक आर.ई.भोळे यांनी आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. सुशोभित ग्रंथदिडीत ग्रंथ (ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान, महात्मा ज्योतीबा फुले साहित्य, कै.बाबासाहेब के.नारखेडे यांचे साहित्य तसेच स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे यांची पुस्तके) यांचा समावेश करण्यात आला होता.

या मान्यवरांनीही लावली हजेरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास एन.नारखेडे, अनिता नारखेडे, कन्या भाग्यश्री नारखेडे, संस्थेचे चेअरमन पी.व्ही.पाटील, नगरसेवक मुकेश पाटील, नगरसेविका शोभा नेमाडे, संस्थेचे ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, मिलिंद पाटील, विजय भंगाळे, सिध्देश पाटील हे देखील सपत्नीक उपस्थित होते. सर्व शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखांचे पदाधिकारी, शिशूविहार नीलिमा चौधरी, तु.स.झोपेच्या सुरवाडे, एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयमच्या प्राचार्य कोमल कुलकर्णी, के.नारखेडे महाविद्यालय प्रभारी प्राचार्य ए.जी.श्रीवास, सी.बी.एस.सी.स्कूल, दीपनगर शाखेच्या प्राचार्या रणजित कौर व केएनसीटीआय बी.ए.पाटील, आजी-माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

पालखीचे जंगी स्वागत

शोभायात्रेत लेझीम पथक, ग्रंथदिंडी, संस्थापकांचे छायाचित्र प्रदर्शन, वेशभुषा (सजीव रथयात्रा), ढोलपथक, तसेच विद्यालय व विद्यालयाचे संबंधित पदाधिकारी व शिक्षक यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या चित्ररथाचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रेरणा देणार्‍या घोषणा दिल्या. शाळेच्या माजी ज्येष्ठ शिक्षिका निर्मला भारंबे, कुमूदिनी फेगडे, रजनी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घालून उत्साह व्दिगुणीत केला. ठिकठिकाणी शोभायात्रेचे, लेझिम पथकाचे प्रदर्शन तसेच पालखीचे संस्थेच्या सर्व भगिनी शाखांतर्फे जंगी स्वागत व पूजन करण्यात आले.

Copy