विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी 25 महाविद्यालयांमध्ये केंद्रे

0

जळगाव – कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक विषयक मार्गदर्शन व शंकांचे निरसन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत २५ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शंका निरसन व समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असून या अहवालात परीक्षा आयोजनासंदर्भातील शिफारशींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.या अहवालातील शिफारस क्रमांक ८ नुसार कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन सुरू करावी असे नमूद करण्यात आले आहे.परीक्षांसाठी तसेच शैक्षणिक वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहाय्य मिळण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशनाची सोय उपलब्ध करून द्यावी असेही म्हटले आहे.
त्या अनुषंगाने कुलगुरू प्रा पी.पी.पाटील यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना उद्भवणार्या शंकांचे निरसन करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शंका निरसन व समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर महाविद्यालयाची यादी देण्यात आली आहे. या यादीत महाविद्यालयांतर्गत येणारे तालुके आणि विद्याशाखा तसेच समन्वयकाचे नाव, मोबाईल क्रमांक व ई- मेल नमुद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे संपर्क साधावयाचा आहे. विद्यापीठात स्थापन केलेल्या कक्षाचे कामकाज सोमवारपासून सुरू झालेले असून गेल्या चार दिवसात ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दूरध्वनी व ईमेल द्वारे आपल्या शंका विचारल्या.या शंकांचे निरसन करण्यात आले व आता सविस्तर उत्तरे देखील तयार केली जात आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी हे कक्षाचे समन्वयक म्हणून काम पाहत असून सदस्य म्हणून प्रा.किशोर पवार, प्रा.समीर नारखेडे, प्रा.अजय पाटील, प्रा.नवीन दंदी, प्रा.उज्वल पाटील हे काम पहात आहेत.

Copy