विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करा; केंद्राची सूचना

0

नवी दिल्ली- शाळकरी मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे ही शिक्षण क्षेत्रातील मोठी समस्या बनली आहे. शिक्षण तज्ज्ञांबरोबरच डॉक्टरांनीही वाढत्या दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने सर्व केंद्रशासित प्रदेशांसह राज्यांना दप्तराचे ओझे कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी होणार आहे.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी वेळोवेळी संबंधित विभागांकडून वारंवार निर्देश दिले गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी मद्रास हायकोर्टाने या मुलांच्या पाठीवरुन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे तसेच पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास न देण्याचे निर्देश दिले होते. कोर्टाचे हा निर्णय देशभरात चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संबंधी सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत की, शाळांमध्ये विविध विषयांची शिकवणी आणि मुलांच्या दप्तरांचे वजन याबाबत भारत सरकारने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची काळजी राज्य सरकारने घ्यायची आहे.

या नियमावलीनुसार, पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे दीड किलोपेक्षा अधिक असायला नको. तसेच तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे २ ते ३ किलो असावे, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ४ किलो, आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे साडेचार किलो आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ५ किलो असायला हवे.

यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, शाळांनी शिक्षण विभागाच्या निर्देशांना केराची टोपली दाखवली होती. मात्र, शिक्षण तज्ज्ञांच्या मते आता थेट केंद्र सरकारने आदेश दिल्याने शाळा याचे पालन करतील असी आशी आहे. चिल्ड्रन स्कूल बॅग अॅक्ट २००६ नुसार, शाळकरी मुलांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शरीराच्या एकूण वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा अधिक असायला नको. मात्र, याकडे शाळा गांभीर्याने लक्ष देत नाहीत, असे आढळून आले आहे.