Private Advt

विद्यार्थ्यांचे शिक्षक प्रेम : गोंडगावातील शिक्षिकेच्या बदलीनंतर विद्यार्थी ढस-ढसा रडले

भुसावळ/भडगाव : विद्यार्थी व शिष्यातील नाते अतूट असते व याच अतूट नात्याचा प्रत्यय भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथेही अनुभवास आला. भडगाव तालुक्यातील गोंडगाव जिल्हा परीषद शाळेच्या शिक्षिका संगीता पाटील यांची उपखेड, ता.चाळीसगाव येथे बदली झाली व हे वृत्त विद्यार्थ्यांना कळताच विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला गराडा घातला व शाळेतून न जाण्यासाठी आग्रह धरला. यावेळी विद्यार्थी ढसाढसा रडले व हे दृश्य पाहून शिक्षिकाही गहिवरल्या. याबाबतचा व्हिडिओ नुकताच सोशल मिडीयातही व्हायरल झाला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीव लावला की मुलेही भरभरून प्रेम करतात याचा प्रत्यय जिल्हावासीयांना या निमित्ताने आला आहे.

व्हिडिओ वेगाने होतोय व्हायरल
आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अक्षरश: शिक्षिकेला गराडा घालून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी शिक्षिका संगीता पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळले व दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या.

मॅडम नका ना जावू !
गेल्या तीन वर्ष पासून गोंडगाव (ता.भडगाव) येथील जिल्हा परीषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका संगीता पाटील यांची नियमाप्रमाणे पदोन्नती झाल्याने उपखेड (ता.चाळीसगाव) येथे बदली झाली आहे. आपल्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या शिक्षिकेची बदली झाल्याचे समजल्यावर मात्र विद्यार्थ्यांना काय करावे सुचत नव्हते. विद्यार्थ्यांनी संगीता पाटील यांना गराडा घालत रडायला सुरवात केली. मॅडम तुम्ही जाऊ नका, अशी आर्त हाक देत विद्यार्थी रडू लागले. यावेळी या मुलांची समजूत कशी घालायची ? असा प्रश्न संगीता पाटील यांच्यासह उपस्थित शिक्षकांना पडला होता.

विद्यार्थ्यांचे प्रेम कधीही न विसरता येण्यासारखे
या विद्यार्थ्यांना आपणच जीव लावला, असे नव्हे तर त्यांनीही आपल्यावर तेवढंच प्रेम केले असल्याने आपल्याला ही अश्रू आवरणे कठीण जात आहे, असे संगीता पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तहान, भूक, झोप सगळेच विसरल्यासारखं झाले आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्याला लावलेले प्रेम आपण कधीच विसरू शकणार नाही, अशा भावनाही संगीता पाटील यांनी व्यक्त केली.