विद्यार्थीनीकडे घरभाडे मागणे आले अंगलट; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

0

पुणे:- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीकडे घरभाडे मागणे घरमालकीणीच्या अंगलट आले आहे. विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय निर्देशांचं उल्लंघन केल्या प्रकरणी घरमालकीणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याची रहिवाशी असलेली मेघा बोथरा ही विद्यार्थीनी सध्या पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आली आहे. या प्रकरणाविषयी माहिती देताना पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग म्हणाले,”मेघा चंद्रपूर असून, ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली आहे. ती पुण्यातील नवी पेठ भागात खोली भाड्यानं घेऊन राहते,” असं सिंग म्हणाले.

श्रेया लिमण घरमालकीणीचं नाव आहे. मेघा घरभाड्यापोटी महिन्याला १७०० रुपये देते. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारनं लॉकडाउन लागू केला. त्यामुळे तिच्याकडे घरभाडं देण्यासाठी पैसे आले नाही. पोलिसांच्या माहितीप्रमाणे लिमण यांनी मेघाकडे घरभाड्याची मागणी केली. तसेच घरभाडं देणं शक्य नसेल, तर खोली रिकामी करण्यास सांगितलं.

२४ मार्चपासून देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारनं पुढील तीन महिने घरभाडे न मागण्याचे निर्देश दिले होते. “विद्यार्थीने तक्रार दाखल केल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात सरकारनं जारी केलेल्या निर्देशाप्रमाणे महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy