विदेशी कंपन्यांविरोधात भारत बंदची हाक

0

28 सप्टेंबरच्या बंदला पुण्यातील संस्थांचाही पाठिंबा

पुणे : किरकोळ व्यापार अस्थिर व उद्ध्वस्त करू शकणार्‍या वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार तसेच किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूक यास विरोध करण्यासाठी शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली यांनी संपूर्ण भारत बंदचे आवाहन केले आहे. त्यास भारत भरातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात देखील सर्व संस्थांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

विदेशी कंपन्यांना मुबलक आर्थिक बळ मिळत असून त्यांना केवळ 2 ते 34 व्याजदरावर व्यवसायाकरिता निधी उपलब्ध होत असतो. तसेच जगभरातील कोणत्याही भागातून ते स्वस्त दरात माल खरेदी करतात. भारतामध्ये कृषीनंतर सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून करून देणार्‍या किरकोळ व्यापार क्षेत्रास 10 ते 20 टक्के व्याजाने निधी उपलब्ध होतो. तसेच त्यांना भारतातून वस्तू जास्त दराने घ्याव्या लागतात. हा मोठा असमतोल आहे. त्यामुळे छोट्या दुकानदारांना व्यवसाय बंद करणे भाग पडेल.

‘वॉलमार्ट’, ‘किसको-मॅट्रो’ सारख्या मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत व युरोपमध्ये मोठे मॉल्स व दुकाने उघडली व परिणामी तेथील छोट्या व्यापार्‍यांना आपले व्यवसाय बंद करावे लागले आहेत. अशा कंपन्यांकडे 80 ते 85 टक्के व्यापार आहे व त्यांनी उत्पादकांची (शेतकरी व उद्योजक) आपल्या खरेदीच्या मक्तेदारीच्या आधारे पिळवणूक केली. तसेच ग्राहकांनाही खरेदीसाठी पर्याय उपलब्ध राहिले नाही. खरेदीच्या वेळी अडवणूक करून स्वस्तात माल घेणार. स्पर्धक नसल्याने एक प्रकारे हुकुमशाही सारखा कारभार असल्याने अर्थकारणावर होणारा हा मोठा हल्ला आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही, असे कॅट पश्‍चिम विभागाचे समन्वयक अजित शेठिया यांनी सांगितले. वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार हा 2016 प्रेसनोट तीन अन्वये शासनाने नमूद केलेल्या शर्तींचा भंग करणारा आहे. असेही शेठीया यांनी यावेळी सांगितले.

Copy