‘विदाउट’ शिवसेना सरकार चालेल!

0

चंद्रकांतदादा पाटलांनी शिवसेनेला डिवचले
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील भेटीने राजकीय वातावरण ढवळले गेले असतानाच, शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरीही सरकार टिकेल आणि पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी करून, शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्याचा फटका त्यांनाच अधिक बसेल. राज्य अस्थिर होईल तसेच शिवसेनाही अस्थिर होईल, असे सूचक वक्तव्यदेखील चंद्रकांतदादांनी केले. पवार कुणालाही भेटू शकतात, त्यात नवीन काय; ते जन्ममित्र आहेत, असा शाब्दिक टोलाही पाटील यांनी पवारांना लगाविला.

पवार इतके उशिरा कसे भेटले?
चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यानिमित्त ते दौर्‍यावर आले असता, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केल्याचे पवारांनी उघड केले आहे, असे त्यांना विचारण्यात आले असता, चंद्रकांतदादा म्हणाले, शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. तसे त्यांनी केले तर ते स्वतः व राज्य अस्थिर होईल, याची त्यांना चांगलीच जाणिव आहे. शरद पवारांची ठाकरे यांनी भेट घेतली यात विशेष असे काही नाही. पवार हे जगन्मित्र आहेत. आम्हालादेखील त्यांनी कर्जमाफीबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. मी त्यासंदर्भात दोनवेळा त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीचा राजकीय अर्थ काढला गेला तर काय करणार; आणि पवार-ठाकरे यांचे जुने संबंध आहेत. उलट ते इतक्या दिवसांनी का भेटलेत, आधी का भेटले नाहीत, असे प्रश्न मला पडले आहेत, असा चिमटाही चंद्रकांतदादांनी काढला.

कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही; आणि पडलीच तर सरकारवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. सरकार वाचविण्याची यंत्रणा सरकारकडे उभी असेल. विदाऊट शिवसेनासुद्धा सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे.
– चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

Copy