विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन

0

यवतमाळ : माजी खासदार आणि वेगळ्या विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते जांबुवंतराव धोटे यांचे शनिवारी पहाटे तीन वाजता हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना हदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वेगळ्या विदर्भासाठी केलेली आंदोलने आणि विधानसभेतील भाषणांमुळे त्यांना ‘विदर्भाचा सिंह’ अशी उपाधी देण्यात आली होती. धोटे हे महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाचवेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आले होते. 2002 साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. धोटे यांच्या निधनामुळे विदर्भावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पार्थिवावर उद्या लासीना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

लढवय्ये व्यक्तिमत्त्व हरपले :मुख्यमंत्री
विदर्भाच्या विविधप्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठनेते जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने शेतीआणि प्रादेशिक विकासाच्या समतोलाबाबतआग्रही भूमिका मांडणारे लढवय्ये आणि वादळी व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशातम्हणतात, श्री. धोटे यांनी आमदार आणिखासदार म्हणून केलेले कार्य पथदर्शी आहे.

सच्चा विदर्भवादी हरपलाः मुनगंटीवार
विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेली कामगिरी बघता त्यांच्यातील कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आपल्याला ठळकपणे दिसतो. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिले, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड : अशोक चव्हाण
माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला. आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने आणि आक्रमकपणे मांडले. जांबुवंतराव धोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी धोटे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

सच्चा लढवय्या गेलाः आठवले
जांबुवंतराव धोटे कायम शेतकरी वंचित आणि मागास घटकांच्या विकासासाठी आग्रही होते. आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने आणि आक्रमकपणे मांडले. विदर्भविर अशी उपाधी त्यांना लाभली होती, अशा शब्दात केंद्रिय सामाजिकन्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धोटे यांना श्रध्दांजली वाहिली.