विटनेरला रात्रीतून उभारला राष्ट्रपुरुषाचा पुतळा!

0

जळगाव । जळगाव तालुक्यातील विटनेर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात रात्रीतूनच राष्ट्रपुरुषाचा पुतळा बसविण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणाची तहसीलदार व पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळ गाठल्याने संभाव्य वाद व तणावाची घटना टळली. दरम्यान, रहिवाशांच्याच हाताने हा पुतळा सन्मानाने हटविण्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकार्‍यांची उपस्थिती- विटनेर हे या गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात 1986 पासून राष्ट्रीय पुरुषाचे स्मारक व ओटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुतळे बसविण्यास बंदी घातल्याने देशभरात कुठे नवीन पुतळ्याची स्थापना होत नाही. विटनेर येथे रात्री कोणीतरी स्मारकाच्या ओट्यावर राष्ट्रपुरुषाचा पुतळा बसविला. सिमेंटमध्ये बांधकाम करुन हा पुतळा बसविण्यात आला होता. हा प्रकार सकाळी सात वाजता शेजारी राहणार्‍या लोकांच्या लक्षात आला. त्यांनी पोलीस पाटील साहेबराव धूमाळ व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबू पिंजारी यांना सांगितला. या दोघांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर म्हसावद दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी यांना घटनेची माहिती देण्यात आली. सूर्यवंशी, जितेंद्र राठोड, प्रकाश पवार, सुशील मगरे, समाधान पाटील यांनी गावात भेट देवून ग्रामस्थांकडून माहिती घेतली.

गावकर्‍यांनीच काढला पुतळा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना ही माहिती दिली. त्यानंतर उपअधीक्षक सचिन सांगळे, तहसीलदार अमोल निकम व पोलिस निरीक्षक कुराडे यांनी गावात जावून गावकर्‍यांची बैठक घेत लोकांची समजूत घातली. विनापरवानगी बसविण्यात आलेल्या राष्ट्रपुरुषाचा पुतळ्यावरुन त्याचे काय परिणाम होवू शकतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो याची जाण सांगळे यांनी गावकर्‍यांना करुन दिली. यानंतर पुतळा सन्मानाने काढण्यात आला.यावेळी फौजफाटा तैनात करण्यात आला होता.