विज्ञान व तंत्रज्ञानच्या मार्गावर चालावे

0

भुसावळ । सी.व्ही. रमण व कुसुमाग्रज यांनी सांगितल्याप्रमाणे क्रांतीचा जयजयकार करत विज्ञान व तंत्रज्ञानच्या मार्गावर जर आपण चालत राहिलो तर मराठी भाषेच्या माध्यमातूनसुद्धा आपण रात्रीच्या गर्भातील उद्याचा उष:काल विज्ञान क्षेत्रात घडवून आणु शकू. समाजात विज्ञानविषयक जाणिवा रुजवितानाच दैनंदिन जीवनात विज्ञानाचे उपयोजन वाढविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम महाविद्यालयसुद्धा राबवित असते. नव्या पिढीत विज्ञान-तंत्रज्ञानाचे शिल्पकार घडावेत, यासाठी आम्ही सर्व नक्कीच प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांनी केले.

महाविद्यालयाला आले सांस्कृतिक जत्रेचे स्वरुप
संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अंतरंगला 26 पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ आधुनिक कवी, नाटककार व कादंबरीकार वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणुन साजरा केला जातो. संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान पारंपरिक वेशभूषा दिवसाच्या रुपात साजरा केला गेला. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्व संध्येला आलेला मराठी भाषा दिवस असा हा सुवर्ण योग महाविद्यालयातील भावी अभियंत्यांनी उत्साहात साजरा केला. संपूर्ण महाविद्यालयाला आज सांस्कृतिक जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. मराठी नववारी, पैठणी पासून ते देशभरातील अनेक पारंपारिक पोशाखाने सजुन विद्यार्थी व विद्यार्थिनी संपूर्ण महाविद्यालयात मिरवत होते.

विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीला नविन मापदंड मिळवून द्यावे
मराठी ही सर्व संपन्न भाषा असून तिला तंत्रज्ञान भाषा म्हणून विकसित करण्याचे काम भावी अभियंत्याकडून अपेक्षित आहे. मराठी भाषेच्या माध्यमातून प्रचंड कार्य उभारून विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात या भाषेला नविन मापदंड मिळवून देण्याचे आवाहन आज आपण सर्वांना पेलवायचे आहे असे इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅल्ड टेलीकम्यूनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

आधुनिक पिढीची परंपरेशी अजूनही घट्ट नाळ कायम
पुस्तकी ज्ञानासोबत सामजिक बांधिलकीची जाणीव होण्यासाठी दरवर्षी महाविद्यालयातील स्नेह संमेलमनामध्ये पारंपारिक वेशभूषा दिवस साजरा केला जातो. लोक म्हणतात आजची आधुनिक पिढी आपले मूळ विसरत चालली आहे, मात्र काळाचे संदर्भ जरी बदलू लागले असले तरी परंपरेशी असलेली नाळ अजूनही घट्ट आहे असे या कार्यक्रमातून दिसून येत आहे असे मत स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. अजित चौधरी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. पारंपारिक वेशभूषा दिवस परीक्षक म्हणून प्रा. सुलभा शिंदे, प्रा. जितेंद्र चौधरी, प्रा. किशोर चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली. मेहंदी स्पर्धा परीक्षक म्हणून प्रा. नीता नेमाडे, प्रा. वाय.व्ही. वाघ, प्रा. स्मिता चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली.