Private Advt

विजेच्या धक्क्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू : ममुराबाद गावातील घटना

जळगाव : ममुराबाद येथील 13 वर्षीय बालकाचा हिरटचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. प्रणव पाटील (वय 13) असे मयताचे नाव आहे. या घटनेमुळे लग्न घरात शोककळा पसरली तर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. रविवार, 17 रोजी सकाळी आठ वाजता ही घटना घडली.

लग्नघरी पसरली शोककळा
मुकूंदा पाटील (ममुराबाद, ता.जि.जळगाव) हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला असून मुकूंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने घरात लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. रविवार, 17 एप्रिल रोजी मुकूंदा पाटील आणि त्यांची पत्नी दीपाली पाटील हे दोघेजण भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रणव हा घरी एकटाच होता. सकाळी 8 वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये बादलीत हिटर लावले होते. त्यानंतर बाजूलाच प्रणव आंघोळ करण्यासाठी बसला. अचानक त्याला विद्यूत हिटरचा धक्का लागल्याने प्रणवचा जागीच मृत्यू झाला.

माता-पित्यांचा मन हेलावणारा आक्रोश
लग्नात आलेले रवींद्र पाटील हे घरी आले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आई-वडीलांनी हंबरडा फोडला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.