विजय मल्ल्याला न्यायालयाचा दणका; संपत्तीचा होणार लिलाव

0

नवी दिल्ली: किंगफिशरचे मालक विजय मल्ल्याला पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. एसबीआयसह अनेक बँकांना मल्ल्याची संपत्ती जप्त करून लिलाव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव कधीही होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ईडीनेही या वसुलीवर काहीच आक्षेप नसल्याचे कोर्टाला सांगितले होते. त्यामुळेही कोर्टाने मल्ल्याची संपत्ती वसूल करण्याची बँकांना परवानगी दिली आहे.

किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेल्या विजय मल्ल्यावर ९ हजार कोटींची फसवणूक केल्याचा तसेच मनी लाँडरिंगचा आरोप आहे. त्यामुळे त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून डिसेंबरमध्ये ब्रिटनमधील एका कोर्टात मल्ल्याने प्रत्यार्पणास आव्हान दिले होते. तिथे मल्ल्याच्या विरोधात निर्णय देताना कोर्टाने मल्ल्याला भारताच्या हवाली करण्यास परवानगी दिली होती.

भारताकडून प्रत्यार्पणाच्या अनुशंगाने ज्या काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत, त्या सर्व समाधानकारक असल्याचेही कोर्टाने ही परवानगी देताना नमूद केले होते. मल्ल्याला आणण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये गेली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून होते. काही महिन्यांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण बँका त्याचा हा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता नाही.

Copy