विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा

0

मुक्ताईनगर : गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आहे. जनतेने नेहमीच भाजपावर विश्‍वास दाखवित प्रतिसाद दिला. त्याबरोबर इतरही निवडणुका आपण स्वबळावर लढविल्या आणि त्या जिंकल्या आहे. युतीचा निर्णय वरीष्ठ पातळीवर ठरणार आहेच तसेच मतदार संघात असंख्य विकासाची कामे झाली आहे. ही कामे कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. भाजपाने विकासकामांना प्राधान्य दिले म्हणूनच जनतेने कायमच आपल्यावर विश्‍वास दाखविला आहे. त्यातच आपण जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. त्याचेच श्रेय जनता आपल्याला मतदानरुपी आशिर्वादातून देत असते. तसेच उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता पक्षासाठी काम करावे, असे आवाहन माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर शनिवार 17 रोजी फार्म हाऊसवर भाजपा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची बैठक माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत पार पडली.

विकासकामांना मंजुरी
तसेच अल्पसंख्यांक व मागासवर्गियांसाठी अनेक विकासकामांना मंजुरी मिळत आहे व मतदार संघात ज्या ज्या गावांना किडनीचे पेशंट आहे त्या गावांना आरओ फिल्टर प्लॅन्ट खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने बसविणार आहे. विकासाची कामे होतच राहतील. आपआपसात मतभेद असतील तर ते त्वरीत मिटविण्याचे आवाहन करीत भाजपा कार्यकर्त्यांवर जनतेचा विश्‍वास आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व जागा निवडून आणत इतिहास घडविण्याचे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.

आमदार निधी व खासदार निधीतून बसविले हायमास्ट लॅम्प
याप्रसंगी पुढे बोलतांना आमदार खडसे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनेक गट, गण मागासवर्गियांसाठी राखीव झाल्याने त्यांना बर्‍याच कालावधीनंतर संधी मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी आपल्याला मतदान करुन घडविले आता आपण जीवापाड मेहनत करुन त्यांना निवडून आणायचे आहे. त्यामुळे आजपासून कामाला लागावे. आमदार निधी व खासदार निधीतून हायमास्ट लॅम्प मतदार संघात सर्वाधिक दिले आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी बैठकीस जिल्हा संघटनमंत्री प्रा.डॉ. सुनिल नेवे, रमेश ढोले, अशोक कांडेलकर, सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, पंचायत समिती सभापती राजू माळी, विलास धायडे, विधानसभा संघप्रमुख शिवाजी पाटील, जिल्हा बँक संचालक नंदू महाजन, योगेश कोेलते, सरपंच ललित महाजन, सरचिटणीस संदिप देशमुख, डॉ. बी.सी. महाजन यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन सतिश चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक रमेश ढोले यांनी करुन आरक्षणाचे वाचन विलास धायडे यांनी केले.