Private Advt

वाहन हस्तांतरणासाठी लाचेची मागणी : भुसावळातील पंटर विरोधात गुन्हा

जळगाव आरटीओ कार्यालयातील काहींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

जळगाव : अ‍ॅक्टीव्हा या दुचाकी वाहनाच्या हस्तांतरणासाठी 200 रुपये लाचेची मागणी करणार्‍या उप प्रादेशिक परीवहन कार्यालयातील पंटरच्या विरोधात रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरटीओ कार्यालयातील काही कर्मचार्‍यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पू भोळे, (35, रा.जे.के.मोटार ड्रायव्हींग स्कूल, जामनेर रोड, भुसावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.

स्वाक्षरीसाठी मागितली लाच
याबाबत वृत्त असे की, 59 वर्षीय तक्रारदार हे वाहन मालकांकडून ऑथॅरिटी लेटर घेऊन वाहनांच्या हस्तांतरणाचे काम करतात. या अनुषंगाने एका होंडा अ‍ॅक्टीव्हा कंपनीच्या दुचाकीच्या हस्तांतरणासाठी ते आरटीओ कार्यालयात आल्यानंतर प्रशांत भोळे यांनी काम करून देण्याच्या मोबदल्यात 200 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी रोजी सापळा रचण्यात आला मात्र संशय आल्याने भोळे यांनी लाच स्वीकारली नाही मात्र 11 ऑक्टोबर रोजी लाच मागितली असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याविरोधात गुरुवार, 28 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.