Private Advt

वाहनाला कट लागल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

जळगाव : नव्यानेच चारचाकी शिकणार्‍या तरुणाने दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथेदेखील दोन्ही गटांमध्ये जुंपल्याने तणावाचे वातावरण पसरले. गुरुवार, 11 रोजी दुपारी हा प्रकार घडला.

जिल्हा रुग्णालयात दोन गटात वादावादी
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी मोहाडी रस्त्यावर चारचाकी शिकणार्‍या तरूणाच्या कारचा एका दुचाकीला कट लागला. यातील दुचाकीस्वार हा मोहाडी येथील रहिवासी होता. कट लागल्याच्या घटनेवरून कारमधील तरूण आणि दुचाकीस्वाराने फोन करून आपापल्या मित्रांना बोलावले. यामुळे मोहाडी रोडवर दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यानंतर या हाणामारीत जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता तेेथे देखील दोन्ही गटातील तरूण एकमेकांना भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे दोन्ही गट शांत झाले असले तरी परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात दोन्ही गटातील लोकांनी मोठी गर्दी केली आहे. या हाणामारीमध्ये आदील शेख शकील, आतीक शेख आणि सौरभ नन्नवरे हे तीन जण जखमी झाले आहेत. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.