वारू उधळता कामा नयेत

0

नेपोलियन हा जगप्रसिद्ध सेनापती कधी आपल्या शौर्याच्या गमजा करीत नसे. तर आपल्या चतुराईच्या गोष्टी त्याने जगाला सांगितल्या. केव्हा वाघाचे कातडे पांघरावे आणि कधी कोल्ह्याचे कातडे पांघरावे, याची आपल्याला चांगली जाण आहे. म्हणूनच आपण अनेक युद्धे जिंकली, असे त्याचे सांगणे होते. याचा अर्थ असा, की कधीकधी दोन पावले माघार घेऊनही बाजी मारता येते. शिकार करणारा वाघही आपल्या शौर्याचे प्रदर्शन मांडून आक्रमण करीत नाही. शिकार टप्प्यात येण्यापर्यत संयम राखतो आणि दबा धरून बसतो. कारण शौर्याच्या जाहिरातीपेक्षाही शिकार साधली जाण्याला महत्व असते. शिवसेनेने वाघ ही प्रतिमा आरंभापासूनच घेतलेली आहे आणि त्यामागची संकल्पनाही आरंभीच्या काळातल्या शिवसैनिकांच्या मनात रुजवण्यात शिवसेनाप्रमुखांनी हयात घालवली होती. म्हणूनच अर्धशतकात राजकारण खेळताना त्यांनी अनेकदा माघार घेतलेली दिसली आणि त्यांची संपादक विश्लेषक विरोधकांकडून यथेच्छ टिंगलही झाली. पण त्यांच्या अशा माघारी वा दोन पावले मागे येण्याची फ़ळे शिवसेनेला नेहमीच चाखायला मिळालेली होती. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव होता. पण त्या आक्रमकतेचे प्रदर्शन मांडताना त्यांनी डाव फ़सणार नाहीत; याची पुर्ण काळजी घेतलेली असायची. आक्रमकतेचे प्रदर्शन मांडताना सापळ्यात शिवसेना कधी फ़सली नाही. आजच्या शिवसेनेत नेमकी तीच उणिव वारंवार दिसते. शनिवारी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पत्रकार परिषद घेऊन एकतर्फ़ी माघार घेतलेली आहे आणि सेनेकडून त्यांच्या माघारीचे स्वागतही झालेले आहे. पण ही माघार भाजपाने कशामुळे घेतली हे विसरून, सेनेने अनाठायी आक्रमक पवित्र्यात हाती आलेली बाजी वाया घालवता कामा नये. कारण आज बाजी हाती आलेली असली तरी शिवसेनेच्या बळामुळे तो पल्ला गाठला गेलेला नाही. परिस्थितीने असे वळण घेतले, की त्याचा लाभ सेनेला मिळालेला आहे.

भाजपावर शिवसेनेचा असलेला राग समजू शकतो. गेल्या विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजपाने युती मोडण्याचा पवित्रा घेतल्यापासून शिवसैनिक रागावलेला आहे. आपला विश्वासघात झाला, अशी त्याची समजूत चुकीची नाही. स्वबळावर सत्ता काबीज करण्याच्या हव्यासापोटी भाजपाने शरद पवारांशी छुपी अघोषित युती करून, पंचवीस वर्षाच्या जुन्या मैत्रीला तिलांजली देण्याची चुक केली. त्यासाठीच पवारांनी भाजपाला हरभर्‍याच्या झाडावर चढवले होते. तसे चढणे ही चुक होतीच. पण त्यानंतरही भाजपाला चढलेली नशा आक्षेपार्ह होती. आपण पवारांवर विसंबून किती आक्रमक पवित्रा घ्यावा, याचेही भान भाजपाला राहिलेले नव्हते. म्हणूनच बाहेरून बिनशर्त पाठींबा देण्याच्या पवारांच्या शब्दावर विसंबून भाजपाने सरकारही स्थापन केले. त्यातून शिवसेना अधिकच डिवचली गेली. पण पवारांच्या अघोषित पाठींब्यावर सरकार चालवणे अशक्य असल्याचे फ़डणवीसांच्या लौकरच लक्षात आले आणि त्यांनी त्याची विनाविलंब कबुलीही दिलेली होती. म्हणूनच त्यांनी धावपळ करून शिवसेनेशी जुळते घेतले आणि त्यांनाही सत्तेत सहभाग दिला. पण ती युती मनपासून होऊ नये, यासाठी भाजपातला एक गट अखंड राबत राहिला. त्यामुळे तुटलेली युती जुळली नाही आणि महापालिका निवडणूकीत वितुष्ट पराकोटीला जाऊन पोहोचले. इतक्यात पवारांनी आपला पवित्रा बदलला आहे. सेनेने पाठींबा काढून घेतला, तर आपण भाजपाची यापुढे पाठराखण करणार नसल्याचा उघड संकेत पवारांनी नांदेड येथे कॉग्रेसशी जुळते घेऊन दिला. त्यातूनच भाजपाची हवा गेलेली आहे. त्याचा लाभ म्हणून शिवसेनेला मुंबईत महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. थोडक्यात आधी पवारांनीच भाजपाला खेळवले आणि आता त्यांचे पाठबळ गेल्याने भाजपा वरमला असेल, तर त्याचा लाभ घेताना शिवसेनेने अतिशय सावध रहाण्याची गरज आहे.

मुंबईतला महापौर निवडून आणताना भाजपाला माघार घ्यावी लागली, म्हणून सेनेने फ़ुशारून जाण्याचे कारण नाही. त्याकडे एक भावी राजकारणाची संधी म्हणून बघणे शहाणपणाचे ठरेल. विधानसभेतील यशामागे पवारांची पाठराखण असताना भाजपाने आपली कुवत ओळखून सेनेशी संबंध ताणल्यानेच आज तो पक्ष गोत्यात आला आहे. म्हणूनच त्याचे अनुकरण सेनेने अजिबात करता कामा नये. भाजपाशी स्पर्धा चालू़च ठेवावी. पवारांच्या डावपेचातील प्यादे होण्यासारखा भाजपा वागला, त्याची फ़ळे आज त्याला भोगावी लागत आहेत. थोड्या यशाने फ़ुशारण्याचे ते दुष्परिणाम आहेत. त्यापासून सेनेने धडा घ्यावा आणि भाजपासारखा आगावूपणा करण्याचे कारण नाही. त्यापेक्षा सावधपणे आपली शक्ती वाढवत भाजपाला छोटा भाऊ बनवण्याचे डाव जरूर खेळावेत. मात्र त्या नादात कॉग्रेस वा राष्ट्रवादीला लाभ मिळणार नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. पवारांनी भाजपाला मोठा पक्ष होऊ दिला. पण स्वबळावर बाजी मारता येणार नाही, अशा पांगळा मात्र करून ठेवला आहे. उद्या पवारांचे अनुयायी माघारी परतले, तर भाजपापाशी कितीसे उमेदवार शिल्लक रहातील? जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत जिंकणारे उमेदवार शोधताना भाजपाची दमछाक होईल. तिथेच त्या पक्षाने आपले नुकसान करून घेतले आहे. मोदीलाटेचा लाभ उठवून आपल्या जुन्या निष्ठावंतांना विजयी करण्याला प्राधान्य देण्यापेक्षा, झटपट सत्तेमागे धावताना अन्य पक्षातून उधारीवर आणलेले उमे़दवार पक्षाचा पाया रुंदावण्यात उपयोगी ठरणारे नसतात. भाजपाने अशा लोकांना सोबत घेऊन शिवसेनेशी युती मोडून टाकली. आता उद्या दोन्ही कॉग्रेस एकत्र आल्यास भाजपा त्यांचा एकाकी सामना करण्याच्या स्थितीतही आलेला नाही. ही मोठी राजकीय चुक आहे. तोच निकष शिवसेनेलाही लागू होतो. एकट्याच्या बळावर शिवसेनाही दोन्ही कॉग्रेसच्या आघाडीला पराभूत करण्याच्या स्थितीत नाही.

पवारांनी पाठ फ़िरवली, मग भाजपाची स्थिती काय होते, हे नांदेड भेटीनंतर उघड झाले आहे. त्यामुळेच सेनेने अतिशय सावधपणे पुन्हा हिंदूत्वाची युती व्हावी, याकडेच लक्ष दिले पाहिजे. मात्र युती पुन्हा मजबूत करताना शिवसेनेने पुन्हा मोठा भाऊ होण्याची संधी साधली पाहिजे. तसे करताना मोठा भाऊ म्हणून भाजपाने ज्या चुका केल्या, त्याची पुनरावृत्ती सेनेने टाळायला हवी. मोठा भाऊ धाकट्याच्या चुका पोटात घालतो, हे भाजपा विसरला आणि त्याने सोमय्या-शेलारांना मोकाट उधळू देण्याची घोडचुक केलेली आहे. ती चुक सेनेकडून होता कामा नये. बोलावे गोड, पण हवे तेच साधावे, अशी चतुराई असायला हवी. प्रत्येकजण उठून शिवसेनाप्रमुख असल्याच्या थाटात जी मुक्ताफ़ळे उधळली जातात, त्याला पहिला लगाम लावला पाहिजे. सौ सोनारकी एक लोहारकी असे बाळासाहेब म्हणायचे. तसे निर्णायक बोलणे पक्षप्रमुख वगळता अन्य कोणाकडूनही होता कामा नये. प्रवक्ते वा नेते असलेल्यांना संयमाचे बंधन सेनेने घातले, तरच चाणाक्षपणे सेनेला ताज्या संधीचा पुरेपुर लाभ घेता येईल. राजकारणात संधी किती मोठी वा छोटी याला महत्व नसते. जी संधी येते, तिचा पुरता लाभ उठवण्याची क्षमताच राजकारणाला चालना देत असते. पवारांच्या खेळीमुळे भाजपा गडबडून गेला आहे. म्हणून सेनेचे वारू उधळले, तर पवार चतुराईने आपल्या खेळासाठी सेनेचाही सहज वापर करू शकतील. ज्यांनी भाजपाच्या चाणक्यांना धडा शिकवला, त्यांना सेनेचे वाचाळवीर वापरायला वेळ लागणार नाही. मुंबईत भाजपाने कॉग्रेसची जागा व्यापलेली आहे आणि ग्रामिण भागात सेना विधानसभेपेक्षा मागे पडली आहे. याचे भान ठेवून किती सावधपणे पक्षप्रमुख पुढले राजकारण खेळतात, यावर सेनेचेच नव्हेतर भाजपाचेही भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच शक्य तितक्या अधिक लोकांना जोडून घेत आणि दुरावलेल्यांना सामावून घेत सेनेला जावे लागणार आहे.