वारणानगर येथे किसानपुत्रांचे 5 व 6 जानेवारीला राज्यस्तरीय शिबीर

0

कोल्हापूर : किसानपुत्र आंदोलनाचे सहावे राज्यस्तरीय शिबीर येत्या 5 आणि 6 जानेवारी रोजी वारणानगर (कोल्हापूर) च्या ‘शेतकरी संसद’ भवनात होणार आहे. या शिबिरात शेतकऱ्यांच्या गुलामीची कारणे, शेतकरी विरोधी कायदे आणि किसानपुत्र आंदोलन आदी विषयांचा उहापोह केला जाणार आहे.

5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. माजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन सोहळा पार पडेल.

शेतकरी आत्महत्यांची कारणे व उपाय, शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे मुद्दे, कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, शेतकरी आणि संविधान या विषयांवर शिबिरात विचार मंथन केले जाईल. या शिबिरात केवळ 70 जणांनाच प्रवेश दिला जाईल. इच्छूकानी शिबीर संयोजक चिदंबर चांदूरकर 9922331122 यांच्याशी संपर्क करावा.

किसानपुत्र आंदोलन

किसानपुत्र आंदोलन ही संघटना नाही. शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे आंदोलन आहे. मकरंद डोईजड या किसानपुत्राने 31 बी म्हणजेच 9 परिशिष्टच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. हेच किसानपुत्र आता आवश्यक वस्तू कायद्याला आव्हान देण्याची तयारी करीत आहेत.

Copy