वायू प्रदूषणाबाबतची मोजणी ‘हवेत’च!

0

गेल्या तीन महिन्यांपासून यंत्रणा बंद

पुणे : शहरातील हवेच्या प्रदूषणाबाबत ‘रिअल टाइम’ मोजणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध ठिकाणी मोजणी यंत्रणा बसविली आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून ती बंद आहे. त्यामुळे मंडळाच्या संकेतस्थळावरही हवेच्या प्रदूषणाच्या सद्यस्थितीबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (एमपीसीबी) प्रादेशिक स्थरावर हवेचे रिअल टाइम मॉनिटरिंग’ बंधनकारक आहे. याद्वारे हवेतील प्रदूषणकारी घटक आणि त्यांचे हवेतील प्रमाण याबाबत अभ्यास करणे शक्य होते. या कार्यासाठी मंडळातर्फे शहरात पाच ठिकाणी रिअल टाइम मॉनिटरिंग’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड, स्वारगेट, नळस्टॉप, कर्वे रस्ता आणि भोसरी याठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. या यंत्राद्वारे हवेतील गुणवत्ता निदेशांक आणि त्याची सद्यस्थिती पडताळता येते. यासंदर्भातील माहिती एमपीसीबी’च्या संकेतस्थळावरदेखील नियमितपणे प्रसिद्ध करण्यात येते. मात्र ऑगस्टनंतर मंडळाच्या संकेतस्थळावर वायूप्रदूषण विषयक कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे म्हणाले, मंडळाने उभारलेल्या या यंत्रणेच्या देखभालीची जबाबदारी ‘एआयसीटीई’ संस्थेकडे आहे. संस्थेतर्फे सध्या या यंत्रणेचे ‘अपग्रेडेशन’चे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

Copy