‘वायसीएम’मध्ये व्हिसेरा ठेवण्यासाठी मिळाली खोली

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील अनोळखी आणि विघटन झालेले मृतदेह ठेवण्यासाठी वापरात असलेली खोली ‘व्हिसेरा’ ठेवण्यासाठी देण्यात आली आहे. त्या खोलीचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला असून, त्या ठिकाणी केवळ ‘व्हिसेरा’ ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शवविच्छेदनासाठी आलेले तसेच विघटीत झालेले मृतदेह ठेवण्यास जागा नसल्याने डॉक्टर आणि पोलिसांमध्ये बाचा-बाचीचे प्रकार घडू लागले आहेत. या माहितीस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनीदेखील दुजोरा दिला आहे.

अनेक दिवसांपासून व्हिसेरा पडून
एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर ‘व्हिसेरा’ (मृत व्यक्तीच्या शरिराच्या अवयवाचे भाग) राखून ठेवला जातो. त्या व्हिसेराची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. म्हणून पोलीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिसेरा राखून ठेवतात. मात्र, वायसीएम रुग्णालयात अनेक व्हिसेरा अनेक दिवसांपासून पडून आहेत. ते पोलिसांनी अद्याप नेलेले नाहीत. बहुतांश व्हिसेरा हे ग्रामीण भागातील असल्याचे सांगण्यात आले. पूर्वी हे व्हिसेरा वायसीएम रुग्णालयातील तातडीक विभागाजवळ ठेवण्यात येत होते. बर्‍याच दिवसांपासून तेथे व्हिसेरा असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत होता. म्हणून पोलिसांनी व्हिसेरा ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली देण्याची मागणी केली होती. अधीक्षकांच्या सुचनेनुसार शवविच्छेदन विभागातील खोली आता पोलिसांना व्हिसेरा ठेवण्यासाठी देण्यात आली.

शवविच्छेदन विभागाची गैरसोय
शवविच्छेदन विभागाची खोली व्हिसेरा ठेवण्यासाठी पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे पोलिसांची सोय झाली. मात्र, शवविच्छेदन विभागाची गैरसोय झाली असून, शवविच्छेदनासाठी आलेले अनोळखी व विघटन झालेले मृतदेह आता कोठे ठेवावेत, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टर आणि पोलिसांमध्ये वाद होत आहेत. या संदर्भात वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, पोलिसांच्या मागणीनुसार रुग्णालय प्रशासनाकडून ‘व्हिसेरा’साठी स्वतंत्र खोली देण्यात आली आहे. दरम्यान, स्थापत्य विभागाशी संपर्क साधून तेथे अन्य एखादी खोली बांधण्यात येईल का, याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसे पत्रही देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.