Private Advt

वादात मध्यस्थी करणार्‍या पित्याचा मुलाने केला खून कढईपाणी गावातील घटना

खुनानंतर आरोपी मुलगा पसार

शिरपूर : पती-पत्नीचे भांडण सुरू असतानाच वडिलांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग आल्याने संतापाच्या भरात मुलानेच वडिलांच्या पाठीवर धारदार शस्त्र मारून त्यांचा खून केला. शिरपूर तालुक्यातील कढईपाणी येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत पेमा हिरा पावरा (वय 72 रा. कढईपाणी, उमरदा ता. शिरपूर) यांचा मृत्यू झाला तर संशयीत आरोपी असलेला मुलगा सुकराम पेमा पावरा (51) हा पसार झाला आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यस्थी केल्याने वडिल मुकले प्राणाला
कढईपाणी येथे पेमा पावरा हे पत्नी मुलगा व सुनेसह वास्तव्यास होते. संशयीत सुकराम पावरा याचे पत्नीशी भांडण सुरू असताना आरोपी पत्नीला शिविगाळ करीत असल्याने वडिलांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा राग आल्याने आरोपीने सुकरामने तीक्ष्ण हत्याराने वडीलांच्या पाठीवर वार करत त्यांना जिवे ठार मारले. या घटनेनंतर सुकराम हा पसार झाला.

जागीच झाला मृत्यू
अतिशय दुर्गम भागात कढईपाणी असून पेमा पावरा यांच्यावर मुलाने हल्ला केल्यानंतर ते जागीच कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. गावातील लोकांनी खाटेवर टाकून त्यांना उपचारार्थ हलवण्यासाठी धडपड केला मात्र उतारवय व त्यातच पाठीवर घाम वर्मी लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा काही वेळेतच मृत्यू ओढवला. याबाबत बिकराम पेमा पावरा (27) याच्या फिर्यादीवरून सुकाराम पावराविरोधात शिरपूर तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ करीत आहेत.