Private Advt

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी केली सुरू मोफत बससेवा

0
बालाजी पवार यांनी राबविला स्तुत्य उपक्रम
नवी सांगवी  : धारूर येथील नागरीक आणि विद्यार्थ्यांसाठी धारूर, मोर्डा ते तुळजापूर दरम्यान उद्योजक बालाजी पवार यांच्या पुढाकाराने मोफत बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या बससेवेमुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. पवार यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विधायक उपक्रम राबविला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील धारूर, मोर्डा हा रस्ता आडमार्गी असल्याने वेळेवर बस येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर तुळजापूरला पोहोचता येत नाही, तसेच बसअभावी नागरिकांचीही गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी धारूर येथील उद्योजक बालाजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत बस सेवा सुरु करण्यात आली.
स्वागतार्ह गोष्ट
यावेळी तुळजापूरचे नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, महंत माऊजीनाथबुवा, महंत तुकोजीबुवा, नगरसेवक सचिन रोचकरी, पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, शहाजी जाधव, विशाल रोचकरी, राम छत्रे, निलेश रोचकरी, आबा रोचकरी, आण्णा क्षीरसागर, भरत सोनवणे, रसाळ, विशाल पवार आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष चंद्रकांत कणे म्हणाले की, आज अनेक ठिकाणी वाढदिवसाला अवास्तव खर्च केला जातो. मात्र, पवार यांनी हा खर्च टाळून विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वखर्चाने बससेवा चालू केली आहे. ही निश्‍चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा व महविद्यालयात पोचता येईल. बस सेवा सुरु झाल्याने विद्यार्थीनीच्या सुरक्षततेचा प्रश्‍न सुटला आहे.