Private Advt

वाघोदा खुर्द येथील ट्रक चालकाचे अपहरण : घातपाताचा संशय !

सावदा : सावदा येथून जवळच असलेल्या वाघोदा खुर्द येथून नवीनच घेतलेल्या मालवाहू ट्रकसह ट्रक मालकाचे अपहरण झाल्याचा प्रकार पाच महिन्यांपूर्वी घडला होता. संशयीतांनी ट्रक चालकाचा खून केल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी सावदा पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करीत एका आरोपीला केली. ऋषिकेश उर्फ माधव विठ्ठल शेजवळ (24, डावरवाडी, ता.पैठण, जि.औरंगाबाद) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर अन्य दोघे संशयीत पसार झाले आहेत.

ट्रक चालकाच्या खूनाचा संशय
वाघोदा खुर्द येथील याकुब गयासोद्दीन पटेल (35) यांनी नवीन मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.6843) खरेदी केल्यानंतर 15 मे 2021 रोजी ट्रकसह त्यांचे अपहरण झाल्याने या प्रकरणी पटेल हरवल्याबाबत सावदा पोलिसात नोंद करण्यात आली होती. सुमारे पाच महिन्यांनी या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याकुब पटेल यांच्यासोबत सुरूवातीपासून असलेल्या ऋषिकेश उर्फ माधव विठ्ठल शेजवळ (24, डावरवाडी, ता.पैठण, जि.औरंगाबाद), यास अटक करण्यात आली आहे तर त्याचे इतर दोन साथीदार अद्याप पसार आहेत. आरोपींनी ट्रक नागपूर येथे विक्री केला व याकुब पटेल याचा यासाठी खून करून प्रेताची विल्हेवाट लावली असल्याचा सावदा पोलिसांना संशय आहे. हवालदार संजय चौधरी यांचे फिर्यादीवरून सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शेजवळ याने चौकशीत दोन साथीदार राजू ठेगडे (पवन नगर, नाशिक) व संजय (पूर्ण नाव माहित नाही, औरंगाबाद) यांची नावे सांगितली आहेत. या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. तपास सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर करीत आहेत.