वसईच्या विनायक भोईरची मुंबई रणजी संघासाठी निवड

0

वसई : अर्नाळा येथील विनायक भोईर याची रणजी स्पर्धेच्या पुढील सत्रासाठी मुंबईच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. मुंबईसाठी निवडला गेलेला तो वसई तालुक्यातील पृथ्वीनंतरचा दुसरा खेळाडू ठरला असून विशेष म्हणजे दोघांचीही निवड एका महिन्याच्या अंतराने झाली आहे. पृथ्वी शॉ रणजी स्पर्धेत चमकत असतांनाच विरारच्याच आणखी एका खेळाडूची रणजी कसोटीसाठी निवड झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

पृथ्वीची गेल्याच महिन्यात मुंबई रणजी संघात निवड झाली होती. त्याने पदार्पणातच शतक ठोकून मुंबईला अंतिम फेरीत नेण्यात निर्णायक खेळी केली होती. इतकेच नाही, तर नुकताच झालेल्या आयपीएलसाठी पृथ्वीला तब्बल चार कोटीची बोली लागली होती. वसईकरांसाठी ही अभिमानाची बाब असतानाच, आता अर्नाळा येथील विनायकची रणजीसाठी संभाव्य संघात निवड झाल्याने वसईत आनंदाचे वातावरण आहे. विनायकचे प्राथमिक शिक्षण अर्नाळा विद्यामंदिर शाळेत झाले. शालेय व स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपुर्ण कामगिरी करताना त्याने आपली छाप पाडली होती.