वर्‍हाडाची मिनी बस पलटली

0

चाळीसगाव । मलेगाव तालुक्यातील साकुर येथून लग्न सोहळा आटोपूननिंभोरा (ता.- धरणगाव) कडेे जाणार्‍या वर्‍हाडाची मिनी बस तालुक्यातील देवळी आडगावजवळ दुपारी पलटली. या अपघातात 25 पेक्षा जास्त वर्‍हाडी किरकोळ व गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही मिनी बस भरधाव वेगात जात होती मात्र अपघाताच्या नेमक्या करणाबद्दल खात्रीलायक माहिती लगेच समजु शकली नाही. या अपघातात जिवीत हानी झाली नाही हेच सुदैव समजुन संबंधीतांनी आपघाताच्या कारणांबद्दल फार चौकशी करण्याचे टाळले. जखमींना वेळेत उपचार मिळावेत व वधू आणि वराच्या कुटूंबियांना दिलासा मिळावा याच विचारात सर्व संबंधित होते.

लग्न सोहळा आटोपून परततांना अपघात 

धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील भास्कर शालिक पाटील यांचा पुतण्या नितीनचा विवाह साकुर (ता.मालेगाव) येथील बळवंतराव दिनकर पाटील यांची कन्या मेघाशी आज संपन्न झाला. लग्नसोहळा आटोपून निभोरा (ता.- धरणगाव)कडे 32 वर्‍हाडी घेऊन जाणारी मिनी बस मालेगावकडून चाळीसगाव मार्गे निंभोरा (ता.- धरणगाव) कडे जात असतांना देवळी आडगावजवळ मिनी बस पलटी झाल्याने या अपघातात प्रमोद प्रताप बोरसे (40), चुडामण लक्ष्मण पाटील (43), लोटन वामन पाटील (60), संजय भगवान पाटील (48), दिलीप श्रीराम पाटील (42), भालेराव परशुराम सोनवणे (75), डॉ. रामभाऊ माधवराव पाटील (55), समाधान रोहिदास सोनवणे (24), धर्मा खंडू पाटील (65), शिवाजी शालिग्राम पाटील (50), अशोक जिजाबराव पाटील (40), मुरलीधर कृष्णा पाटील (30), राजेंद्र रामचंद्र पाटील (48), योगेश मोतीलाल पाटील (15), ज्ञानेश्वर आत्माराम सोनवणे (35), भिवराव निंबा पाटील (39), चेतन संजय पाटील (17), आशालता पाटील (25), पंडित चैत्राम पाटील (30), रामचंद्र भगवान पाटील (45), रोहिदास जगन्नाथ पाटील (50), रतिलाल दशरथ पाटील (60), जनार्दन तापीराम कोळी (65), भगवान प्रकाश पाटील (20), स्वप्नील समाधान सोनवणे (17, सर्व रा निंभोरा ता धरणगाव) हे जखमी झाले यातील काहीजण किरकोळ तर काही जणांना हात, पाय, डोके व शरीरावर गंभीर इजा झाल्या आहेत. जखमींवर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणून प्राथमिक उपचार करण्यात आले व नंतर गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

चाळीसगावकरांचे माणुसकीचे दर्शन

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील व शहरातील अनेक नागरिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांनी मिळेल ते वाहन घेऊन घटनास्थळ गाठले खाजगी वाहन, रुग्णवाहिकांमध्ये टाकून जखमींना चाळीसगाव येथे ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये नेण्यासाठी मदत केली. गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यामागे सरकारी रुग्णालयांमधील गैरसोय टाळण्याचा हेतू होता. त्यामुळे किरकोळ जखमींनाच फक्त सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले. विवाहाच्या शुभप्रसंगी विघ्न टळल्याने दिलासा व्यक्त होत होता.