वर्षभरात 52 स्कूल बसेसची परवाने निलंबीत

0

जळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा स्कुल बस समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जानेवारी ते नोव्हेबर 2016 पर्यंत दोषी आढळणार्‍या 52 स्कूल बसेसचे परवाने निलंबीत केल्याची माहिती दिली. यातच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अभिलेखावर एकूण 410 स्कूल बसेसची नोंदणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी बैठकीत माहिती दिली. या बैठकीत जिल्ह्यातील पोलीस, परिवहन, शिक्षण तसेच नगरविकास, एसटी महामंडळ आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीस उपप्रादेशिक जयंत पाटील यांनी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांबाबत उपस्थित सदस्यांना माहिती दिली. तर स्कूल बस समिती व शालेय स्तरावरील परिवहन समिती सदस्य म्हणून प्रत्येक तालुक्यासाठी परिवहन विभागाचे वाहन निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तर समित्यांच्या बैठका नियमित घेण्यात याव्या अशा सुचना पोलीस अधीक्षकांनी केल्या.

357 स्कूलबसची फेरतपासणी
जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखावर 410 स्कूलबसेसची नोंदणी करण्यात आली असून नागपुर खंडपीठाच्या निर्देशनानुसार 30 नोव्हेंबर पर्यंत 357 बसेसची फेर तपासणी केली आहे. तर त्यापैकी 113 स्कूलबस चालकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर त्यामधील 52 स्कूलबसेसची परवाने निलंबित करून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना बैठकीत दिली. डिसेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष माहिमेत दोषी आढणार्‍या शालेय विद्यार्थी वाहतूकीच्या 59 वाहनांवर कारवाई करण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. 9 जानेवारी 2017 पासून रस्ता सुरक्षा अभियानास सुरूवात होणार असल्याने शिक्षण विभागाने शालेय स्तरावर रस्ते सुरक्षितता या विषयावर प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांमध्ये निंबध स्पर्धा घेवून जिल्ह्यातून दोन्ही गटातून प्रत्येकी तीन विजेते घोषित करावे करून त्यांना बक्षित जाहिर करावे अशी योजना बैठकीत मांडल्यानंतर शिक्षण विभागाने योजनेस मान्यता दिली.