वरणगाव रुग्णालयात जमावाकडून तोडफोड

0

वरणगाव : शहरातील गिदाळी मोहल्ला भागातील विवाहिता समीना बी अकबर मिर्झा (वय 32) हिने घरातील छताच्या सळईला ओढणी बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवार 2 रोजी सकाळी 6. 30 वाजेच्या दरम्यान घडली. मृतदेहास शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र विवाहितेन त्रासामुळे आत्महत्या केल्याची शंका माहेरच्यांना आल्याने त्यांनी सासरच्या मंडळींना मारहाण करुन वाहनांच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीसांनी लागलीच धाव घेवून संतप्त जमावाला शांत केल्याने वाद निवळला.

एरंडोल येथील माहेरवासीन समीना बी अकबर मिर्झा हिचे लग्न वरणगाव येथील जहिर बेग मिर्झा यांच्या मुलासोबत 16 वर्षापूर्वी झाले होते. तीन दिवसांपूर्वी अकबरच्या लहान बहिणीचा विवाह पनवेल (मुंबई) येथे पार पडला. त्यानंतर परतीच्या प्रवासात किरकोळ वाद झाला असता वरणगांव येथे रात्री गिदाळी मोहल्ल्यात राहत्या घरी आल्यावर सासू व सुनेचे शाब्दीक वाद चिघळल्याने समीना बी हिने घरातील छताच्या झरोक्याला ओढणी बाधुन गळफास घेवून जिवन यात्रा संपविली.

अतिरिक्त पोलीस कुमक मागविली
या घटनेची वार्ता शहरात व मयत महिलेच्या माहेरी पसरताच वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. मयत समीना बी हिच्या नातेवाईकांनी रागाच्या भरात पती अकबर मिर्झाच्या परिवारास मारहाण केली व स्कॉरपिओ गाडी क्रमांक एम.एच. 19 ए. पी. 9130 या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या यामुळे ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले असता वरणगांव पोलिस स्टेशनचे अधिकारी दिलीप गांगुर्डे, पीएसआय निलेश वाघ, पोहेकॉ सुनील वाणी, नागेश तायडे, जितेंद्र नारेकर, महेंद्र शिंगारे, भास्कर ठाकूर, सुनील बळगे, मजहर पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र जमावावर नियंत्रण न आल्याने पोलिस अधिकारी दिलीप गांगुर्डे यांनी मुक्ताईनगरचे उपविभागीय अधिकारी समीर नजीर शेख, पोलीस निरीक्षक अशोक कडलग, बोदवडचे अधिकारी चंद्रकात बनकर, संतोष नागरे व जळगाव जिल्हा पोलिसांना पाचारण करुन जमावाला शांत केले.

अकस्मात मृत्युची नोंद
जहीर बेग मिर्झा यांचा वरणगांवच्या राजकारणात दबदबा व आर्थिक पाठबळ भक्कम असल्याने समीनाबीच्या भावांचा विश्वास येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांवर नव्हता. त्यामुळे हे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता पाहून शवविच्छेदनाकरीता धुळे येथील रुग्णालयात केले जाईल अशी मागणी केल्याने प्रेत धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. याबाबत वरणगांव पोलिसात आकस्मात मृत्यू ची नोद करण्यात आली आहे.

वरणगाव रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण
समीनाचा मृतदेह सकाळी 7.30 वाजेला ग्रामीण रुग्णालयात आणला असता मयतीच्या माहेरील नातेवाईकांनी समीनाबी हिला तीच्या सासरच्या मंडळीनी आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याचा आरोप नातेवाईक करीत होते. या संतापाच्या भरात किरकोळ हाणामारीमुळे रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची पोलिसांनी दखल घेवून वातावरण आटोक्यात आणले.