वरणगाव पोलिस ठाण्यातील लाचखोर उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

पोलिस ठाण्यातच स्वीकारली दहा हजारांची लाच : पोलिस वर्तुळात खळबळ

भुसावळ : वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू वाहतूक करणार्‍या डंपरावर कारवाई न करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणार्‍या वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच स्वीकारताच लाच जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यातच हा सापळा यशस्वी झाला. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ वाणी (56, रा.भिरूड कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) व कॉन्स्टेबल गणेश महादेव शेळके (31, पोलीस वसाहत, वरणगाव ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

डंपरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
साकेगाव येथील 30 वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर (क्रं.एम.एच.40 एन. 4086) असून वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्या द्वारे वाळू वाहतूक केली जाते मात्र या वाहनावर कारवाई न करण्यासाठी दोघा आरोपींनी गुरुवारी लाच मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला. पोलिस ठाण्यातच आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या पोलिस ठाण्यात नोकरी केली त्या पोलिस ठाण्यातच दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, एएसबाय दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Copy