वरणगाव पोलिसांची वाहनांवर धडक कारवाई

0

वरणगाव : गेल्या कित्येक दिवसापासून वरणगावातील रहदारीचा प्रश्न चर्चिला जात असल्याने तक्रारी व समस्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने आज पोलिसांनी बसस्थानक चौकात वाहनांवर धडक कारवाई केली. यामुळे अवैध प्रवासी वाहतुक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

पुढार्‍यांकडून पोलीसांवर दबाव
वरणगाव हे परिसरातील ग्रामीण भागाची बाजारपेठ गणली जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे पार्किगच्या समस्येसह नागरिकांची अडचण निर्माण होते तर लहान मोठे अपघातदेखील होत असल्याने रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा, मिनीडोअर, मोटरसायकल आदी वाहनांसंबंधी नागरिकांनी तक्रारी केल्या असता वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय दिलीप गांगुर्डे, पीएसआय निलेश वाघ, पीएसआय प्रदीप ठुबे, सहाय्यक फौजदार भास्कर ठाकुर, कॉन्स्टेबल निखिल नारखेडे, तुषार पाटील, मेहरबान तडवी यांनी 15 ते 20 वाहनधारकांवर बसस्थानक चौकात कारवाई केली असून त्यांचे वाहनांचे कागदपत्र, परवाना, गणवेश तपासून दंड आकारला. प्रसंगी पोलीस वाहनांवर कारवाई करत असताना वाहनधासकांकडून पोलिसांशी हुज्जत करण्याचे प्रकार होत होते तर काही पुढार्‍यांचे देखील दबाव येत असल्याने कारवाईसंबंधी अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र अधिकार्‍यांनी कोणालाही न जुमानता कारवाई सुरु ठेवल्याने वरणगावकरांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.