वरणगावात 11 रोजी रेणूका मातेचा यात्रोत्सव

0

वरणगाव । येथील रेणूका मातेचा यात्रोत्सव मंगळवार 11 रोजी चैत्र पोर्णिमेला साजरा होत आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांचा इतिहास या मंदिराला लाभला आहे. हे देवस्थान जागृत असल्याने भाविकांनी मानलेले नवस फेडण्यासाठी या यात्रेला आवर्जुन उपस्थिती देतात. भोगावती नदीकाठच्या उत्तर दिशेला प्राचीन रेणुका मातेचे मंदिर आहे. देवीची मुर्ती पूर्वाभिमुख असून नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती आहे. परिसरातील अनेक कुटूंबांचे हे कुलदैवत मानले जाते.

चैत्र पौर्णिमेला बारागाड्यांऐवजी निघते काठी मिरवणूक
मंदिराच्या इतिहासाबाबत जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार साडेतीनशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर असल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या जागेवर जुना किल्ला असून किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची लहान मुर्ती बसविलेली आहे. मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. या ग्रामदेवतेच्या मान कायम आहे. पूर्वी गावात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे होते. मंदिराच्या पुर्वेकडील भागात असलेला दरवाजा आजही लोहार दरवाजा म्हणून ओळखले जाते. पूर्वीच्या काळी गावात प्रवेश करतांना या मंदिराचे दर्शन घेतले जात असे, अशी माहिती वयोवृध्द जाणकार देतात. सन 1956 मध्ये मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. अशा जागृत देवस्थानी अनेक वर्षांपासून या यात्रेची परपंरा सुरु आहे. पुर्वी यात्रेच्या मिनित्ताने चैत्र पौर्णिमेला बारागाड्या ओढल्या जात असे मात्र, काही कारणास्तव ही परंपरा खंडीत झाली असून सध्या एकच काठीची मिरवणूक निघते.