वरणगावात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फॅमिली डॉक्टरांनी कसली कंबर

3

वरणगाव : शहरात कोरोनाबाधीत रुग्णांनी मात केली असली तरी रुग्णांची संख्या वाढत असून त्यावर मात करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव मेडिकल असोसिएशनच्या वतीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली. फॅमिली डॉक्टर लक्षण असणार्‍या रुग्णांचे धैर्य वाढवत माहिती पालिकेला व ग्रामीण रुग्णालयाला देणार आहेत.

नगराध्यक्षांनी घेतला पुढाकार
शहरांमध्ये कोरोना विषाणूबाधीत रुग्णांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोेपरी प्रयत्न सुरू असून सूक्ष्म नियोजन व उपाययोजनांसाठी वरणगाव पोलिस स्टेशनच्या आवारात नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव मेडिकल असोसिएशन, वरणगाव पोलिस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शहरातील डॉक्टरांनी ही साखळी तोडण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत सूचना कराव्यात, असे सूचवले. यानुसार कोणताही रुग्ण आधी आजारी पडला असता तो आपल्या फॅमिली डॉक्टरकडे तपासणीसाठी येतो, ही तपासणी करताना डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णाचे मनोधैर्य वाढवून भीती काढावी व स्वॅब घेण्यासाठी प्रेरीत करत वरणगाव नगरपालिका व ग्रामीण रुग्णालयाला कळवले जाईल व त्यांना स्वॅब करण्यासाठी सल्ला देतील व आरोग्य विभाग संबंधित रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांना घरीच विलगीकरण करण्यास सांगितले जाईल यामुळे प्राथमिक सुरुवात असतानाच रुग्णांना शोधणे सोपे जाईल व उपचार होऊन कोरोनाचा प्रसार होण्यास टाळता येईल व उपचारानंतर रुग्णाला लवकर घरी परत येईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, कठोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन सोनवणे, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक पंकज सूर्यवंशी, डॉ.अनंत फेगडे, डॉ.नितीन बढे, डॉ.राहुल भोईटे, डॉ.रवींद्र माळी, डॉ.रुपेश पाटील, डॉ.योगेश कोल्हे, डॉ.राजेश भोळे, डॉ.सुनील अहिरराव, डॉ.दीपक वराडे आदी उपस्थित होते.

कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न : नगराध्यक्ष
कोरोना विषाणूचा प्रसार वरणगाव शहरात वाढत असून या प्रसाराला टाळण्यासाठी डॉक्टर हे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकतात याकरीता वरणगाव मेडिकल असोसिएशनच्या वतीने बैठकीचे आयोजन करून डॉक्टरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तसेच इतर उपाययोजना करण्यावर देखील भर असणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.

Copy