Private Advt

वरणगावात आघाडी-भाजप कार्यकर्ते भिडले

वरणगाव शहर बंद करण्यावरून दोन गटात तुफान फ्री स्टाईल हाणामारी : निवडणुकीपूर्वीच पेटला राजकीय आखाडा

वरणगाव : वरणगाव शहरात महाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडी व भाजपा पदाधिकारी समोरा-समोर आल्यानंतर शाब्दीक वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याने शहरासह राज्याच्या राजकीय खळबळ उडाली. हाणामारीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह दोघा बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोमवार, 11 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीचे पदाधिकारी व्यापार्‍यांना शांततेच्या मार्गाने बंदचे आवाहन करताना भाजपा पदाधिकार्‍यांनी दुकाने उघडण्याचे आवाहन केल्यानंतर बसस्थानक चौकात हा धक्कादायक प्रकार घडला.

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रुग्णालयात दाखल
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात बंदला सोमवारी गालबोट लागल्याने खळबळ उडाली आहे. बसस्थानक चौकात सकाळी 11 वाजता महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर तुफान हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही पक्षाचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करत असताना भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दोन वर्षांपासून व्यापारी आधीच अडचणीत असताना आता पुन्हा बंद पाळू नका, दुकाने सुरू ठेवा, असे आवाहन व्यापार्‍यांना केले. याचवेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरा-समोर आल्याने शाब्दीक वाद वाढत गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी वाद मिटवत कार्यकर्ते पांगवले.

आमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली नाही : राजेंद्र चौधरी
अत्यंत शांततेच्या मार्गाने व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्यासाठी आमच्यातर्फे विनंती करण्यात आली. तत्पूर्वी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आदींना पत्रदेखील देण्यात आले होते. सोमवारी सकाळी काही दुकाने उघडी असल्याने आम्ही हात जोडून विनंती करीत असताना माजी नगराध्यक्ष सुनील काळे व कार्यकर्त्यांनी आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. सुनील काळे यांनी अनेक आंदोलने केली, त्या आंदोलनाला महाविकास आघाडीने कधीही प्रतिउत्तर दिलेले नाही. व्यापार्‍यांना आम्ही धमकावले असल्यास त्यांनी सिद्ध करावे व तसे घडले असतेतर काळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घ्यायला हवी होती. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक मराठे व कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. शहर विकासाची तळमळ आम्हालाही आहे त्यामुळे आम्हीदेखील शहर हितासाठी गुन्हे दाखल करणार नाही, असे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते राजेंद्र चौधरी म्हणाले.

दुकाने बंद करण्यासाठी दडपशाही : सुनील काळे
अल्पसंख्यांक आघाडीचे डॉ.सादीक यांना सर्वात आधी मारहाण करण्यात आली मात्र आम्ही वाद मिटवत शांतता राखली. व्यापार्‍यांनी आपल्याला फोन करून दुकाने बंद करण्यासाठी दडपशाही होत असल्याबद्दल तक्रार केल्याने त्यांना धीर देण्यासाठी काही कार्यकर्त्यांसह बाहेर पडलो. कोरोनामुळे आधीच व्यापारी उद्ध्वस्त झाला असून घटना उत्तरप्रदेशात घडल्यानंतर वरणगावात दुकाने बंद करण्याचे काहीही कारण नव्हते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुधाकर जावळे व राजेंद्र चौधरी यांनी चिथावणी दिल्यानंतर आपल्यासह पाच कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. शहराचा विकास यांना पाहवला जात नाही मात्र जनता भाजपाच्या बाजूने आहे. शहरात शांतता टिकून रहावी म्हणून आम्ही सुडाचे राजकारण न करता गुन्हे दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.