वरणगावात अमृत योजनेच्या तिसर्‍या वाढीव फेरनिविदेला विरोध

3

चौथ्यांदा बोलावली फेरनिविदा : योजनेच्या मंजुरीकडे लागले लक्ष

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगरपरीषदेत अमृत योजनेसाठी बोलावण्यात आलेल्या सभेत तिसर्‍यांदा आलेला पाणीपुरवठा योजनेची निविदा 7.77 टक्के अधिक असल्याने त्यास बहुमताने नगरसेवकांनी विरोध केल्याने पुन्हा चौथ्यांना फेरनिविदा मागवण्याचे ठरले. दरम्यान, 5 जून रोजी वरगणाव नगरपरीषदेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असून 6 जूनपासून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे हे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहे. अमृत योजनेची चौथ्यांदा फेरनिविदा मागवण्यात आली असून आता पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

तिसर्‍यांदा फेरनिविदेला ब्रेक
तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अमृत योजना वरणगावसाठी मंजुर झाली होती व या योजनेतून वरणगावकरांना 24 तास पाण्याचा पुरवठा करण्यात येणार होता. योजनेला विलंब झाल्याने तीन वेळेस निविदा काढण्यात आली तिघे वेळेस मंजूर योजनेच्या रकमेपेक्षा जास्त रकमेने निविदा आल्याने रद्द करण्यात आली व शुक्रवारच्या सभेतदेखील निवेदेचा दर वाढीव असल्याने एक ते दीड कोटी रुपये पालिकेला द्यावे लागणार असल्याने तसेच पालिकेकडे कर्मचार्‍यांचे पगार करण्यासाठीचे पैसे नसल्याने ठराव मंजूर करू नये अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शशी कोलते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, विष्णू खोले, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, प्रतिभा चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली तर उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसूफ, नगरसेविका माला मेढे व मेहणाज बी पिंजारी यांनी सदरच्या योजनेला समर्थन दिले. नागरीकांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने योजना महत्त्वाची असून राजकारण न करता सदरची योजना मंजूर करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले मात्र बहुमताअभावी तिसर्‍यांदा फेरनिविदा बारगळली तस चौथ्यांना पुन्हर फेरनिविदा मागवण्यात आली आहे. या बैठकीला मुख्याधिकारी श्याम कुमार गोसावी व नगरसेवक उपस्थित होते.

वरणगावकरांच्या हितासाठी फेरनिविदा : नितीन माळी
पहिल्या वेळी निविदा जाहीर झाली त्यावेळी एकही कंत्राटदार आला नाही तर दुसर्‍यांदा निविदा आली मात्र त्यावेळी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निविदा उघडण्याचा व ऑर्डर देण्याचा अधिकार होता मात्र 7.99 टक्के दर हा वाढीव असल्याने निविदा नाकारण्यात आली मात्र यापूर्वीचा ठेकेदार हा नगराध्यक्षांच्या मर्जीतला नसल्याने त्यावेळी ती निविदा नाकारण्यात आली होती. नाममात्र पैसे कमी करून व नवीन मर्जीतला कंत्राटदार शोधून काय साध्य झाले? असा सवाल नगरसेवक नितीन माळी यांनी उपस्थित केला. वरणगावकर व नगरपरीषदेचे आर्थिक हित पाहता नवीन फेरनिविदा मागवण्याचे बहुमताने ठरले.

वरणगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करणारच : सुनील काळे
वरणगावकरांना 24 तास पाणीपुरवठ्याचा दिलेला शब्द पूर्ण करणार असून पाणी योजनेच्या निविदेला मंजुरी देण्यात यावी, पिण्याच्या पाण्यात राजकारण करू नका, जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू नका, असा अर्ज केला मात्र पाण्यातही राजकारण करण्यात आले असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले. आज जरी योजनेच्या निविदेला मंजुरी मिळाली नसलीतरी लवकरच ही योजना पूर्णत्वास येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त करीत बहुमत नसल्यामुळे दुर्दैवाने फेर निविदा काढावी लागत असलीतरी योजना पूर्णत्वास येत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Copy