वरणगावातील मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला तत्काळ सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलन

वरणगाव : नगरपरीषदेला कायम मुख्याधिकारी नेमावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी 7 एप्रिल रोजी प्रधान सचिव नगरविकास व विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्याकडे केली होती. राज्य शासनाने मागणीची दखल घेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून जामनेर तालुक्यातील रहिवासी व हल्ली नेवासा, जि.अहमदनगर नगरपरीषदेत कार्यरत समीर शेख यांची वरणगाव नगरपरीषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती केली. नियुक्तीनंतर शुक्रवारी समीर शेख यांनी वरणगाव नगरपरीषदेत येवून पदभार स्वीकारला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला.

यांची होती उपस्थिती
मुख्याधिकार्‍यांच्या स्वागतप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, गोलू राणे, हितेश चौधरी, मिलिंद भैसे, गजानन वंजारी, कृष्णा माळी, दीपक चौधरी यांची उपस्थिती होती.

योजना कामाबाबत पदाधिकार्‍यांचे साकडे
भाजपाच्या वतीने नूतन मुख्याधिकार्‍यांचा सत्कार करून वरणगाव शहरात 10 दिवसाआड पिण्याचे पाणी येत असल्याने महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास व पाण्यासाठी हाल होत असल्याचे बाब निदर्शनास आणून देण्यात आली. शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी प्रसंगी करण्यात आली अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
वरणगाव लोककल्याण हॉस्पिटल हे नगरपरीषदेने ताब्यात घेउन कोविड सेंटर सुरू करावे, संपूर्ण शहरात फवारणी करावी तसेच धुरळणी करण्यात यावी, मंजूर तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराच्या कामाला सुरुवात करावी, भोगावती नदीच्या कामासाठी पाच कोटी 50 कोटी रुपये मंजूर असून त्या कामाला सुद्धा सुरवात करावी, मकरंदनगर व जगदंबा नगरातील प्रलंबित मंजूर गार्डनचे काम उपलब्ध निधीतून सुरू करावे आदी मागणीही करण्यात आली.

ग्रंथालयात फर्निचर व पुस्तके उपलब्ध करण्यात यावी
प्रधान मंत्री आवास 45 नागरीकांनी घराचे काम पूर्ण केले आहे, उर्वरित दुसरा प्रत्येकी दीड लाखांचा हफ्ता खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाला आहे मात्र नगरपरीषदेच्या गलथान कारभारामुळे मंजूर दीड लाख लाथार्थीनां भेटत नसल्याने ही प्रक्रिया लवकर राबवावी तसेच केंद्राने पाठविलेले पैसे वितरीत करावे, पावसाळ्यांपूर्वी नालेसफाई करावी, मास्क व सॅनिटायझर नागरीकांना देण्यात यावे, भूमिगत गटारींचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला असून त्याचा पाठपुरावा करून प्रकल्प सुरू करण्यात यावा, कर्मचारी यांचा पगार नियमित व आकृतिबंध मंजुरीसाठी प्रयत्न करावा आदी प्रश्‍न सोडवण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी नूतन मुख्यधिकारी यांनी मी आपल्या समस्या निकाली काढण्याची जबाबदारी घेत असल्याचे सांगत समस्या मार्गी लावण्याची ग्वाही देतो, मुख्याधिकारी समीर शेख म्हणाले.