वरणगावातील ‘क’ दर्जाच्या तिर्थक्षेत्रांचा विकास रखडला

0

वरणगाव। जिल्हयातील 400 वर्षापूर्वीचे प्राचीन काळातील पुरातन नागेश्वर महादेव मंदिर हे भाविकाचे श्रध्दास्थान आहे. येथील नागेश्वर मंदिराला शासनाने तिर्थक्षेत्र ‘क’ दर्जा दिल्यापासून हे मंदिर विकासापासून कोसो दूर असल्यामुळे आमदार संजय सावकारे यांसह वरणगाव पालिकेच्या सर्व सदस्यांनी पर्याटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे वरणगांव शहरातील नऊ मंदिराचा विकास व्हावा निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

भाजपा कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली होती मागणी
नागेश्वर महादेव मंदिरासह इतरही 9 मंदिरांना तिर्थक्षेत्र ‘क’ दर्जा दिला असून हे मंदिरे अनेक वर्षापासून विकासापासून वंचित आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची सत्ता असतांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यार्ंनी अनेक वेळा तिर्थक्षेत्र विकास अतर्गत नागेश्वर मंदिरासह शहरातील 9 मंदिरांचा विकास व्हावा अशी मागणी केली होती. त्यामुळे या तिर्थक्षेत्रांचा विकास झाल्यास परिसरात पर्यटनाला चालना मिळू शकेल.

पाच वर्षानंतर पुन्हा दिले निवेदन
तब्बल पाच वर्षानंतर पून्हा पालिका गटनेते सुनिल काळे, शेख अखलाद व आमदार संजय सावकारे नगराध्यक्षा अरुणा इंगळे, सुधाकर जावळे यांच्या उपस्थितीत पर्यंटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेवून तिर्थक्षेत्र अंतर्गत विविध विकास कामे करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

प्रस्ताव करण्याच्या सुचना
मंत्री रावल यांनी सदरचे निवेदनावर शेरा मारुन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना सदरचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे सुचित केले आहे. शहरातील बसस्थानक, मुख्य रस्त्याचे दुभाजक, सिग्नल यंत्रणा, रुग्णालयाचे तिसर्‍या टप्प्याचे कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यापैकी शहरातील पाणी पुरवठा व रुग्णालयाचा पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. बर्‍याच विकास कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहरातील रखडलेल्या विकासकामांना देखील गती देण्याची आवश्यकता आहे.