वरणगावकरांची पाण्याबाबत भाजपाकडून दिशाभूल

0

वरणगाव : भारनियमन सुरू नसतानाही भारनियमन बंद करण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वरणगावातील पदाधिकार्‍यांनी वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना निवेदन देवून जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

चुका लपवण्यासाठी खटाटोप
महाविकास आघाडीचे प्रतिनिधी तथा शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, राष्ट्रवादीचे दीपक मराठे, तालुकाध्यक्ष पंकज पाटील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष संतोष माळी आदींनी भाजपाच्या निवेदनाबाबत महावितरणचे उपमुख्य अभियंता गागरे , उपअभियंता कुशवाह, उपअभियंता साळवे यांच्याशी चर्चा केली असता मात्र संबंधितानी कुठेही भारनियमन सुरू नसल्याचे सांगितले त्यामुळे भाजपाने भारनियमन केले जात असल्याचा कांगावा उघड झाला असून आपल्या चुका लपवण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचा आरोपही या पदाधिकार्‍यांनी केला आहे. वीज कंपनी अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, तपत कठोरा भागांमध्ये जी झाडे इलेक्ट्रिक लाईन ला स्पर्श करतात ते काढण्याचे काम तीन दिवसात सुरू होते व त्या तीन दिवसांमध्ये पाच तास, दोन तास व एक तास असे एकंदरीत आठ तास केवळ परमीट घेऊन वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता हे तीन दिवस वगळता कुठेही वीजपुरवठा खंडित केलेला नाही. त्युमळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी चुकीची माहिती जनतेपर्यंत देत असून जनतेचा विश्वासघात करीत आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे सर्व प्रतिनिधी या सर्व गोष्टींचा निषेध करतो.

तर लोकप्रतिनिधी जवाबदार
वरणगाव शहरात पाण्यासाठी आजपर्यंत न घडलेल्या गोष्टीदेखील समोर येत आहेत. पाण्यासाठी हाणामार्‍या होत असून त्यास सर्वस्वी नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. या प्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख प्रशांत पाटील, निलेश सुरडकर, पंकज पाटील, भूषण बाविस्कर, अतुल पाटील, राहुल बावणे, सागर वंजारी, हर्षल वंजारी आदींची उपस्थिती होती.

पाण्यात राजकारण करण्याची संस्कृती नाही ः संजयकुमार जैन
वरणगावकरांसाठी 24 तास पाणी मिळणारी पाणीपुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शहरवासीयांना 24 तास पाणी मिळणे हा उद्देश होता मात्र डिसेंबर महिन्यात महाविकास आघाडी सरकारने या योजनेला स्थगिती दिल्याने आज सहा महिने योजना रखडली आहे मात्र तसे नसते झाले तर सहा महिन्यात 70 टक्के काम पूर्ण झाले असते. पाण्यात राजकारण करण्याचे महापाप आम्ही केले तर नाही ना? पाण्यात राजकारण करणे ही आमची संस्कृती व वृत्ती नाही व कोरोना काळात तर अजिबात नाही.
ट्री कटींगसाठी भारनियमन झाले असल्याचे वरणगावातील भाजपा नेते संजयकुमार जैन म्हणाले.

Copy