वत्सल आश्रमतर्फे राष्ट्रीय ऊर्जा सप्ताह साजरा

0

 भुसावळ : सर्वसामान्यांमध्ये ऊर्जा बचत व संवर्धनाच्या जागृतीसाठी राष्ट्रीय ऊर्जा बचत दिन तसेच राष्ट्रीय ऊर्जा सप्ताह साजरा करण्यात आला. ऊर्जा जागर 2016 या कार्यक्रमाद्वारे तालुक्यातील किन्ही येथील वत्सल ऊर्जा आश्रम या स्वयंसेवी केंद्राद्वारे महिनाभर तालुक्यातील किन्ही, साकरी, खडके, बोदवड तालुक्यातील शिरसाळे अशा विविध ठिकाणी ऊर्जा बचतीसंबंधी व्याख्याने, प्रदर्शने व महाऊर्जाची माहिती पत्रके वाटप करण्यात आली.

‘ऊर्जा वाचवा वसुंधरा वाचवा’ संकल्पना केली विषद
यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमात वत्सल ऊर्जा आश्रमाचे संचालक सुरेेंद्र चौधरी, मिलींद भारंबे, संजीव पाटील, भागवत भिरुड, चंद्रकांत राणे यांनी ठिकठिकाणी जनजागृती अभियान राबविले. या अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील नॅशनल सोलर मिशन 2022 याबाबत अक्षय ऊर्जेद्वारा येत्या 5 वर्षांत 1 लाख 75 हजार मेगा व्हॅट वीज, सौर, पवन, बायोगॅस व लघुजल विद्युत प्रकल्प बनविणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना ऊर्जा अभियंता सुरेंद्र चौधरी यांनी दिली. तसेच घरगुती वीज बचतीबाबत मार्गदर्शन करुन ‘ऊर्जा वाचवा वसुंधरा वाचवा’ ही संकल्पना विषद केली. औष्णिक वीज निर्मितीचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम तसेच ऊर्जा बचत, ग्लोबल वार्मिंग व वातावरणीय बदल यांचे परस्परांशी असलेले संबंध समजावून सांगितले. तसेच प्रश्‍नोत्तराद्वारे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर केल्या. महाऊर्जा विभागीय कार्यालयाचे प्रकल्प कार्यकारी अधिकारी मोहन गांधेले यांनी किन्ही येथे उभारीत असलेल्या वत्सल ऊर्जा आश्रम प्रकल्पाला भेट देवून पाहणी केेली.