Private Advt

वढोद्यात लांडग्याने पाडला चार बोकडांचा फडशा

मुक्ताईनगर : तालुक्यातील वढोदा येथे लांडग्याने हल्ला करीत चार बोकडांचा फडशा पाडला. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडल्यानंतर खळबळ उडाली असून पशू पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मंगळवार, 15 फेब्रुवारी ला शाळीग्राम बोदडे यांच्या शेतात लांडग्याच्या हल्ल्यात 14 बकर्‍या मृत्यू झाल्यानंतर दुसर्‍यांदा अप्रिय घटना घडल्याने वनविभागाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.

अचानक लांडग्याने चढवला हल्ला
शेतकरी श्रीराम बळीराम पाटील यांच्या वढोदा गावालगत असलेल्या गट नं 345/1 या शेतात नितीन शंकर लहासे यांनी बकर्‍यांचा कळप कंपाउंड करून लावला आहे. नितीन लहासे सकाळी आठ वाजेच्या सुमारास आले असता त्यांना आपल्या चार बोकड मृतावस्थेत दिसल्याने त्यांनी लागलीच गावातील श्रीराम पाटील, शिवसेनेचे इम्रान खान, उद्धव कोथळकर, अमोल तायडे, गौतम मोरे यांना बोलावले व वन विभागाला माहिती कळवली. कुर्‍हा वनपाल भावना मराठे व वढोदा वनरक्षक न्यानोबा धुळगंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता हा हल्ला लांडग्यानेच हल्ला केला असल्याचे सांगितले.

चार बोकडांचा हल्ल्यात फडशा
या हल्ल्यात बकरी मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सहा बकर्‍यांपैकी लांडग्याच्या हल्ल्यात चार बोकडांचा मृत्यू ओढवला आहे तर अन्य बोकड लांडग्याने फस्त केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंस्त्र प्राण्यांचा कल गाव वस्तीकडे वाढत असून गत महिनाभरात दोन वेळा लांडग्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्याने पशू पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.