वढोदा उपकेंद्रावर शिवसेनेचा मोर्चा

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील वढोदा येथील वीज उपकेंद्रावर शेतकरी व शिवसैनिकांनी मोर्चा काढून निवेदन दिले. शेतकर्‍यांना नाहक त्रास दिल्यास रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या उपकेंद्रांतर्गत येणार्‍या गावातील शेतकर्‍यांनी व शिवसैनिकांनी उपकेंद्रावर कार्यरत परिचालक सरोज वानखेडे, सपना राऊत व उपस्थित वायरमन कर्मचार्‍यांसमोर संताप व्यक्त करण्यात आला.

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
या परिसरात दोन ते तीन तास लोडशेडिंगमध्ये काम न करता चालू लाईनवर परमिट घेवून काम करीत असल्यामुळे शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठा मिळत नाही. त्यामुळे पिके कोमेजत असल्यामुळे नुकसान होत आहे. तसेच उपकेंद्रात शेतकर्‍यांनी विद्युत तार किंवा डीपीसाठी लागणारे साहित्य मागितले असता ते उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले जाते. त्यामुळे वायरमनला बोलाविले असता साहित्य मिळत नसल्यामुळे वायरमन काम करु शकत नाही. तुम्ही साहित्य विकत घेवून या तरच काम होईल, अशी भूमिका घेतली जाते. तसेच लाईट गेल्यास दूरध्वनीवर संपर्क साधल्यास उत्तर दिले जात नाही. अशा विविध प्रश्‍नांमुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असल्याचे दिसून आले. त्यामुळे या समस्या सोडविण्यात येवून यापुढे काही अघटीत घटना झाल्यास किंवा वीज पुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास महावितरणला जबाबदार धरण्याचा इशारा शेतकरी व शिवसैनिकांनी दिला आहे.