वंचित समाजाकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलणे गरजेचे – दादासाहेब इदाते

0

एमआयटीतर्फे 23 वी संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला

पुणे : आजही देशातील वंचित समाज हा सामाजिक अंधश्रद्धेमधून मुक्त झालेला नाही. समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे. त्यासाठी सामाजिक दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भटक्या व विमुक्त जातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी केले. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात 23 व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. तिचे चौथे पुष्प गुंफताना ‘जे का रंजले ते गांजले’ या विषयावर ते बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, डॉ. आय. के. भट, डॉ. मिलिंद पांडे व डॉ. एल. के. क्षीरसागर याप्रसंगी उपस्थित होते.

तर येणारा काळ घातक ठरेल

जे का रंजले, गांजले हे वाक्य कीर्तनापुरतेच उरले आहे. त्यानुसार देशात उपेक्षित कोट्यवधी लोकांचा उद्धार व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही कृती केलेली नाही. मनुष्य हा परमात्म्याचे रूप असेल तर मानवा मानवात भेदाभेद दिसता कामा नये. वंचित समाजानेच संस्कृती उभी केली आहे. इतिहासाचा अभ्यास करून भविष्यकाळ मजबूत केल्यास वंचित समाजाच्या बर्‍याच प्रश्‍नांचे निराकरण होईल. वंचितासाठी काहीही केले गेले नाही, तर येणारा काळ सर्वांसाठीच घातक ठरेल, असे इदाते यांनी सांगितले.

समाजाची जाणीव ठेऊन कार्य करा

देशातील उग्र प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी आपल्या दृष्टिकोनात परिवर्तन करून परिस्थिती बदलावी लागेल. प्रत्येकाने सभोवतालच्या समाजाची जाणीव ठेऊन कार्य करावे. संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम हे मनोवृत्ती मजबूत करण्याचा पाया आहे. तसेच महाभारत, रामायण या शिवाय मानवधर्म पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच वंचितांची समस्या सोडविण्यासाठी अध्यात्माची पार्श्‍वभूमी असेल तर ते कार्य पूर्ण होईल, असे दादासाहेब इदाते यांनी पुढे सांगितले.

Copy