लोणावळा लायन्स पॉइंटजवळ कार दरीत कोसळून एक ठार, तीन जखमी

0
सर्वजण मध्यरात्रीपर्यंत फिरून पहाटे दोन अडीचच्या सुमारास पुन्हा निघाले मुंबईच्या दिशेने
स्थानिक शिवदुर्ग मित्र बचाव पथकाने केली मदत
लोणावळा : लोणावळा जवळील आयएनएसआय शिवाजी जवळ लोणावळा सहारा (अ‍ॅम्बीव्हॅली) रोडवर कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला असून, तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (28 सप्टेंबर) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झाला आहे. मनिष रमेश प्रितमानी (वय 26, रा. ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. संतोष आनंद पाटील (वय 29), भक्ती अशोक पाटील (वय 20), अमोल नथुराम कुंठे (वय 57, तिघेही रा. ठाणे) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटले
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष प्रितमानी हे त्यांच्या सहकार्‍यांसह गुरुवारी रात्री लोणावळ्या जवळील टायगर व लायन्स पाँईट्स येथे त्यांच्या एक्सयूव्ही कारने (क्रमांक एमएच-46/एएक्स-3232) फिरायला गेले होते. मध्यरात्रीच्या पर्यटनानंतर ते पहाटे दोन अडीचच्या सुमारास ते पुन्हा घरी माघारी जात होते. यादरम्यान लोणावळा-सहारा (अ‍ॅम्बीव्हॅली) लायन्स पॉइंट्स रोडवर आयएनएसआय शिवाजी जवळ असलेल्या एका तीव्र उतारावरील नागमोडी वळणावर चालक मनिष याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रोडलगतच्या दरीत सुमारे दोनशे अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. यामुळे कार चालक मनिष याचा जागीच मृत्यू झाला तर तीनजण गंभीर झाले आहे. अपघाताची माहिती समजताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना केले दाखल
स्थानिक शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला बोलावून घेत त्यांच्या मदतीने दरीत जाऊन अपघातग्रस्त जखमी व मयत यांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आय. जी. शेख हे करीत आहे. शिवदुर्गच्या रोहीत वर्तक, योगेश उंबरे, राजेंद्र कडु, आनंद गावडे, समिर जोशी, प्रणय अंबुरे, राहुल देशमुख, अशोक उंबरे, प्रविण देशमुख, महेश मसणे, राजु पाटील, वैष्णवी भांगरे, दिनेश पवार, साहेबराव चव्हाण, अभिजित बोरकर, सुनिल गायकवाड यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला.