लोणावळा दुहेरी हत्याकांडाचा तपास एसआयटीकडे!

0

लोणावळा : माझ्या मुलाला न्याय मिळत नसेल तर मी जगून काय करणार? असा मनाचा थरकाप उडवून देणारे वक्तव्य करीत मृत सार्थक वाघचौरे याच्या आईने आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर जागे झालेल्या पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकी शाखेतील तरुण-तरुणीच्या हत्याप्रकरणाचा तपास ही एसआयटी करणार आहे. सात अधिकार्‍यांंसह 25 कर्मचारी या तपास पथकात सहभागी असतील. यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असून, हे पथक फक्त याच गुन्ह्याचा तपास करणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पथकात यांचा समावेश…
सार्थक दिलीप वाघचौरे (22) आणि श्रुती डुंबरे (21) या दोन विद्यार्थांची लोणावळा येथील भूशीगावाजवळ 3 एप्रिलला निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळले होते. या हत्येला आता एक महिना उलटल्यानंतरही धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढल्यानेच एसआयटी स्थापनेचा निर्णय घेतला आहे. या तपास पथकाचे प्रमुख स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राम जाधव असतील. पथकात एलसीबीचे तीन, पोलिस ठाण्याचे तीन अधिकारी, तांत्रिक मदतीसाठी अहमदनगरला बदली झालेले पोलिस निरीक्षक सुनील पवार, इतर मदतीसाठी कोल्हापूर येथे बदली झालेले सुनील पाटील या पथकाला मदत करतील. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते या तपासावर देखरेख ठेवतील. यासाठी लोणावळा अथवा खंडाळा येथे या पथकाला स्वतंत्र कार्यालय राहणार आहे. तपासासाठी तीन खासगी सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

आठ पथके ठरली होती निष्प्रभ
संपूर्ण पोलिस यंत्रणा या गुन्ह्याची उकल करण्यासाठी लोणावळ्यात ठाण मांडून आहे. शहर पोलिसांसह पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाची 12 ते 14 अधिकार्‍यांचा समावेश असणारी एकूण आठ पथके या तपासासाठी तैनात करण्यात आली आहे. सार्थक व श्रुतीच्या खुनामागे वैयक्तिक वाद, प्रेमप्रकरण, लूटमार ते अगदी ऑनर किलिंगपर्यंत सर्व शक्यता पोलिसांनी गृहीत धरल्या आहेत. तथापि, आठही पथकांना अद्याप तपासाचे धागेदोरे सापडलेले नाहीत. घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही पोलिसांनी वेगवेगळे कयास बांधून त्याआधारेही तपास सुरू आहे. या तपासात आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र तपासात होत असलेल्या दिरंगाईमुळे सार्थक याच्या नातेवाईकांनी पोलिस तपासाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.