लोडशेंडींग बंद करण्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको

0

सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील करणार उर्जामंत्र्यांसोबत चर्चा
महावितरण व प्रशासनाने आंदोलनस्थळी येऊन मार्ग काढण्याचे दिले आश्वासन
जळगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्यातुन पाठ फिरवताच वीजेच्या भारनियमनाला सुरुवात झाली असुन यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी, विद्यार्थी, युवकांची अडचण सोडविण्यासाठी शिवसेनेने जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गा दरम्यान पाळधी फाटा येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे हादरलेल्या महावितरण व प्रशासनाने आंदोलनस्थळी येऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तर शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न सोडवु, असे आश्वासन दिले.

संतप्त ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा
नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली असतांनाच वीज महावितरण कंपनीने जिल्ह्यात भारनियमन सुरु केले आहे. सकाळ, दुपार, रात्री अशा तीन टप्प्यात वीज जाते. सकाळ व रात्री अभ्यास करायला तर शेतकऱ्यांनाही शेतपीकांना पाणी देण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती होती आहे. तसेच हिंदूंच्या पवित्र सणांमध्ये लोडशोडिंग का ? असा सवाल संतप्त ग्रामस्थ करीत आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. धरणगाव वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी आंदोलनस्थळी येऊन वरिष्ठासोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. वीज भारनियमनाची वेळ बदलण्यात यावी, भारनियमन रद्द करावे किंवा कालावधी कमी करावा. अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करु, असा ईशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.

पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक
दरवर्षी नवरात्र या पवित्र उत्सवावेळी लोडशोडिंग का होते ? महावितरण एकीकडे सक्तीची वसुली करून नियोजन झाले असे सांगते. मग नवरात्र, दसरा व दिवाळीच्या कालावधीत लोडशोडिंग का होते? त्यामुळे महावितरणच्या नियोजनाचा बट्याबोल झालेला दिसून येत आहे. पोलीस उपधीक्षक चव्हाण यांच्यासोबत आंदोलनकर्ते यांची यावेळी शाब्दीक चकमकही उडाली. दरम्यान, आंदोलनाची दखल घेऊन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी शेतकरी, शिवसैनिक व डीवायएसपी चव्हाण यांच्याशी मुंबईहून भ्रमणध्वनीवर संवाद साधला. उर्जामंत्री बावणकुळे यांच्याशी चर्चा करुन भारनियमनाचा प्रश्न मार्गी लावु, असे आश्वासन पाटील यांनी दिले. दरम्यान झालेल्या रास्ता रोकोच्या दरम्यान धुळे व जळगावकडे जाणाऱ्‍या चार रुग्णवाहिकांना वाट मोकळी करुन देऊन शिवसैनिकांनी माणुसकीचा प्रत्यय आणुन दिला.

आंदोलनात यांनी घेतला सहभाग
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, पं.स.सदस्य मुकुंद ननवरे व सचिन पवार, तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखुन धरला. सुमारे दोन तास झालेल्या या रास्ता रोकोमुळे धुळे व जळगावच्या दिशेने दोन्ही बाजुला ३ कि.मी. पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या. आंदोलन प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील, चांदसर सरपंच सचिन पवार, कवठळ सरपंच नितिन कोळी, विभाग प्रमुख गोकुळ लंके, शेरी सरपंच कुमावत, पाळधी सरपंच प्रकाश पाटील, राजाराम कोळी, दीपक सावळे, अनिल कासट, धर्मेन्द्र कुंभार, संजय पांडे, हाजी सुलतान पठान, हाजी अहमद शेख, सादिक देशमुख, दानिश पठान, युवासेना शहरप्रमुख मनोज माळी, पप्पू माळी, पिंटू कोळी, किशोर सोनवणे, दिनेश कडोसे, बलराम कोळी, चंदू इंगळे, हर्षल पाटील, सागर पाटील, भूरा धनगर, श्रावण धनगर, मच्छीन्द्र कोळी, नीलेश साळुंखे यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Copy