लोकसेवेचा वारसा यापुढेही चालवणार

0

उपमहापौरपदाला न्याय देत जनतेच्या समस्या सोडवतोय ः सुनील खडके

जळगाव: ‘उपमहापौरपद हे जनतेची सेवा करण्यासाठीचे असून, जनतेला न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. लोकसेवेचा वारसा आमच्या कुटुंबातच असून, तो यापुढेही राहील’, असा विश्‍वास उपमहापौर सुनील खडके यांनी शहरवासियांना दिला आहे. खडके यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील 19 प्रभागांचा दौरा केला. लोकांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, पक्ष (भाजपा) लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही त्यामागील भूमिका होती. या दौर्‍यांचा समारोप शनिवारी झाला. यातील अनुभव, जनतेच्या मुलभूत समस्या निकाली काढण्यात खडके यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी ‘जनशक्ती’ने त्यांच्याशी संवाद साधला.

सुनील खडके म्हणाले की, माझ्याकडे उपमहापौरपद आल्यानंतर जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात दौरे केले. प्रभाग क्रमांक 1 मधील समस्या जागेवरच सोडवली. जनतेने ज्या समस्या मांडल्या होत्या, त्या सुटल्या अथवा नाहीत याचा पाठपुरावा दुसर्‍या दिवशीही केला. सर्व खाते प्रमुख दौर्‍यात सोबत असायचे. त्यांचेही सहकार्य लाभले. लोकांमध्ये आक्रोश, चीड दिसली पण ती अमृतच्या कामासंदर्भात आहे. या कामामुळे रस्ते खराब झाले आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याशिवाय पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता यादेखील समस्या जनतेने माझ्यासमोर मांडल्या. ते सुरुवातीला माझ्यावर पदाधिकारी म्हणून चिडायचे, असुविधांबाबत संताप व्यक्त करायचे परंतु, समस्या सुटली म्हणजे धन्यवादही द्यायचे. आभार मानायचे, असेही खडके यांनी सांगितले.

घराण्यात जनसेवेचा वारसा
आजोबा पंडित नारायण खडके हे 1945 ते 52 पर्यंत नगरसेवक होते. वडील वामनदादा खडके हे 1968 पासून राजकारणात आहेत. ते दोनवेळा जळगावचे नगराध्यक्ष होते. त्यांच्याकडून मला जनसेवेचा वारसा मिळाला असल्याची भावना सुनील खडके यांनी व्यक्त केली.

टीकेवर बोलणे टाळले
खडके यांनी प्रभागनिहाय दौरे सुरू केल्यानंतर त्याविषयी भाजपाच्या नेत्यांनी नव्याचे नऊ दिवस, अशी उलट प्रतिक्रिया दिली होती. याबाबत प्रश्‍न विचारला असता, खडके यांनी त्यावर बोलणे टाळले. माझं पद हे जनसेवेसाठी आहे आणि तेच काम मी करत राहणार याचा पुनरूच्चार त्यांनी केला. लोकांना अपेक्षा आहेत. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाबद्दल जनतेची प्रतिक्रिया काय होती या प्रश्‍नावर खडके म्हणाले की, आम्ही भाजपाला मतदान केले आहे आणि यापुढेही याच पक्षाला मतदान करू परंतु, आमच्या समस्या सुटल्या पाहिजेत असे जनतेचे म्हणणे होते.

खडसेंशी भेट केवळ सदिच्छापर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल खडके म्हणाले की, ही भेट केवळ सदिच्छापर होती. त्यांच्या तब्बेतीची चौकशी करणे एवढाच एक हेतू होता. त्यामध्ये राजकीय असा कोणताच विषय नव्हता.

आधीपासून मैत्रीपूर्ण संबंध म्हणूनच स्वागत
भाजपाच्या पदाधिकार्‍याने दौर करायचे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. हा विरोधाभास नाही का ? या प्रश्‍नावर खडके म्हणाले की, ज्यांनी स्वागत केले त्यांच्याशी माझे खूप आधीपासून व्यक्तिगत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

Copy