लोकसभेसाठी ५० टक्के जागा हव्यात – राष्ट्रवादी काँग्रेस

0

मुंबई : राज्यात लोकसभेसाठी काँग्रेससोबत आघाडी करताना राज्यातील जागा वाटपात आपल्याला ५० टक्के जागा हव्यात, असा दावा आज राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडीत असलेल्या पक्षांनाही जागा सोडाव्या लागणार असल्याने जागा वाटप अंतिम होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने आपल्याला ५० टक्के जागा हव्या असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे एक बैठक‍ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार माजीद मेनन यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासोबत पवार यांनी नुकतीच भेट घेतली. त्या बैठकीत राज्यात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात झालेली चर्चा आणि जागा वाटपांविषयी काय विषय हाताळण्यात आले त्याची माहिती देण्यात आल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. राहुल गांधींसमोर राज्यात जागा वाटपासाठी ५०-५० टक्के जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य उमेदवारासंदर्भातही चर्चा झाली. तरी कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. त्यासाठी काँग्रेससोबत होणाऱ्या बैठकीनंतरच यावर निर्णय होईल, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.

Copy