लोकसभेसाठी युती हवी, सेना खासदारांचे मत!

0
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. विशेषता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कोणत्याही निवडणुकीत भाजपबरोबर युती न करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली. या घोषणेला ६ महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यावर शिवसेनेमध्येच एकमत नसल्याचे शनिवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत समोर आले आहे. उध्दव ठाकरे यांनी युतीबाबतच्या प्रश्नावर शिवसेनेच्या सर्वच खासदारांनी शांत राहणे पसंत करत एक प्रकारे लोकसभेसाठीच्या युतीच्या प्रस्तावाला मूक संमती देत विधानसभेबाबत तुम्हीच निर्णय घ्यावा अशी विनंती ठाकरे यांना केल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शनिवारी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक मातोश्रीवर बोलविण्यात आली होती. त्यावेळी भाजपबरोबर युती करायची की नाही याबाबतचा सवाल उध्दव ठाकरे यांनी खासदारांना केला. मात्र खासदारांनी ठाकरे यांच्या प्रश्नावर आपले कोणतेही थेट मत मांडण्याचे टाळत चुप्पी साधणेच पसंत केले. तसेच लोकसभेला युती केल्यास सेनेच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेला भाजपशी युती करावी आणि विधानसभेबाबत मात्र तुम्हीच निर्णय घ्यावा असा सूरही याबैठकीत खासदारांनी लावला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यापासून ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत जवळपास सर्वच नेत्यांनी मातोश्रीचे उंबरठे झिजवले. परंतु उध्दव ठाकरे यांच्याकडून त्यावेळी कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भाजपबरोबरील युती होणार की नाही याबाबत शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्यातच आगामी निवडणूकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जाहीर केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा चाचपणी करण्यास सुरुवात केली. मात्र शिवसेनेच्या अनेक खासदारांबरोबरच आमदार आणि शिवसैनिकांना भाजपशी युती व्हावी अशी इच्छा आहे. शिवसेना व भाजपमध्ये युती झाली तरच राज्याच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकण्याची शक्यता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Copy